जलसंपदा विभागाची महापालिकेला नोटीस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जलसंपदा विभागाची
महापालिकेला नोटीस
जलसंपदा विभागाची महापालिकेला नोटीस

जलसंपदा विभागाची महापालिकेला नोटीस

sakal_logo
By

जलसंपदा विभागाची
महापालिकेला नोटीस
तीन कोटी ५० लाख थकबाकी; उपसा बंद करण्याचा इशारा
इचलकरंजी, ता. १५ : कोल्हापूर जलसंपदा विभागाने थकबाकी वसुलीसाठी इचलकरंजी महापालिकेला नोटीस लागू केली आहे. दहा दिवसांत थकबाकी न भरल्यास पंचगंगा नदीतून पाणी उपसा बंद करण्याचा इशारा दिला आहे. सुमारे तीन कोटी ५० लाख इतकी थकबाकी आहे. यातून मार्ग काढण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत.
इचलकरंजी शहराला कृष्णा आणि पंचगंगा नदीतून पाणी पुरवठा केला जातो. त्यापोटी महापालिकेकडून कोल्हापूर आणि सांगली जलसंपदा विभागाकडे शुल्क भरले जाते. मात्र, हे नियमित शुल्क न भरल्याने थकबाकी राहिली आहे. पंचगंगा नदीतून उपसा केल्याबाबतची थकबाकी सुमारे साडेतीन कोटी इतकी आहे. पंधरा दिवसांपूर्वीच सुमारे ७० लाख इतकी रक्कम महापालिकेने भरली आहे. त्यानंतरही ३१ मार्चच्या पार्श्‍वभूमीवर संपूर्ण थकबाकी भरण्याबाबत महापालिकेला नोटीस दिली आहे. येत्या दहा दिवसांत थकबाकी न भरल्यास पाणी उपसा बंद करण्याचा इशारा दिला आहे.
दुसरीकडे सांगली जलसंपदा विभागाची तब्बल १२ कोटी इतकी थकबाकी आहे. यातील सुमारे ४० लाखांची रक्कम काही दिवसांपूर्वी भरली आहे. त्यामुळे पुढील कारवाई टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून पाठपुरावा सुरू आहे. अद्याप तरी सांगली जलसंपदा विभागाची नोटीस महापालिकेला आलेली नाही. मात्र, त्यांच्या बरोबर चर्चा सुरू असल्याचे महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. यापूर्वी थकबाकी न भरल्यामुळे सांगली जलसंपदा विभागाने कृष्णा योजनेचे उपसा केंद्र सील केले होते. त्यामुळे प्रशासनाकडून याबाबतची खबरदारी घेण्यात येत आहे.
---------------
चौकट
एकरकमी थकबाकी भरण्याचे प्रयत्न
सध्या पंचगंगा योजनेची सुमारे साडेतीन कोटी थकबाकी आहे. यातील विलंब आकार, दंड व्याज याचीच रक्कम सुमारे ५० टक्के इतकी आहे. त्यामुळे यात सूट मिळण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये जर मार्ग निघाला, तर एकरकमी थकबाकी भरण्याची तयारी महापालिका प्रशासनाकडून सुरू आहे.