भाजपची तयारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भाजपची तयारी
भाजपची तयारी

भाजपची तयारी

sakal_logo
By

भाजपची लोकसभेची तयारी सुरू


आज ऑनलाईन बैठक ः प्रदेशाध्यक्षांसह नेते करणार मार्गदर्शन

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. १५ ः लोकसभा निवडणुकीला तब्बल वर्षभराचा अवधी असला तरी भारतीय जनता पार्टीने मात्र या निवडणुकीची तयारी सुरू केली असून, त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाशी संबंधितांची बैठक उद्या (ता. १६) बोलवण्यात आली आहे. ऑनलाईन होणाऱ्या बैठकीला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक मार्गदर्शन करणार आहेत.
केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शहा येत्या रविवारी (ता. १९) जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर उद्या होणाऱ्या या बैठकीला महत्त्‍व आले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीसह शिवसेनेकडून अजून उमेदवार कोण, याचा पत्ता नसताना भाजपने मात्र ही निवडणूक आतापासूनच गांभीर्याने घेत त्यासाठीची तयारी सुरू केली आहे.
उद्या (ता. १६) दुपारी सव्वादोन वाजता ही बैठक होणार आहे. या बैठकीला भाजपचे जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) समरजितसिंह घाटगे, जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांच्यासह कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील प्रदेश व मंडल पदाधिकारी, शक्ती केंद्र व बूथप्रमुख यांनाही निमंत्रित केले आहे. भाजपच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून या बैठकीची ऑनलाईन लिंक शेअर केली असून, त्यात बैठकीचा पासवर्ड व लिंकचा नंबर देऊन सहभागाचे आवाहन केले आहे.
सद्यस्थितीत दोन्ही काँग्रेससह, ठाकरे गटाची शिवसेना व भाजपकडेही लोकसभेसाठी तयारी केलेल्या उमेदवाराची वानवा आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून २०१९ च्या निवडणुकीत शिवसेनेच्या ‘धनुष्यबाण’ चिन्हावर निवडून आलेले खासदार प्रा. संजय मंडलिक हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली बाळासाहेबांची शिवसेना गटात गेले आहेत. त्यामुळे भाजप चिन्हावर ही निवडणूक लढवणार असेल तर त्यासाठी उमेदवार कोण असेल, यावर उद्याच्या बैठकीत चर्चा अपेक्षित असल्याचे समजते.
...........