
बारावी आयटी विषय परीक्षेवर बहिष्काराचा शिक्षकांचा इशारा
बारावी आयटी विषय परीक्षेवर
बहिष्काराचा शिक्षकांचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १६ : कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावरील माहिती तंत्रज्ञान (आयटी) विषय शिक्षकांचे वेतन अनुदानासह अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. याबाबत शासनाकडून कोणताही निर्णय घेतला जात नसल्याने बारावीच्या माहिती तंत्रज्ञान विषयाच्या
ाऑनलाईन परीक्षेवर बहिष्काराचा इशारा कनिष्ठ महाविद्यालयीन माहिती तंत्रज्ञान विषय शिक्षक संघटनेतर्फे देण्यात आला आहे.
शाळा, महाविद्यालयात विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी माहिती तंत्रज्ञान शिक्षक महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. २१ वर्षांपासून हे शिक्षक पाच हजार रुपये मानधनावर कार्यरत आहेत. त्यांनी शासनाचे वरिष्ठ वेतनश्रेणी प्रशिक्षणही पूर्ण केले आहे; पण त्यांच्या मानधनात एका रुपयाचीही वाढ झालेली नाही. माहिती तंत्रज्ञान या विषयाला वेतन अनुदान द्यावे, अशी या शिक्षकांची मागणी आहे; मात्र शासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे.
दरम्यान, बारावीच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेसाठी माहिती तंत्रज्ञान हा विषय शिकवला जातो. या विषयाची परीक्षा २३, २४ व २५ मार्च रोजी होणार आहे. वेतन अनुदानाबाबत शासनाकडून निर्णय घेतला जात नसल्याने आयटी शिक्षकांनी या विषयाच्या ऑनलाईन परीक्षेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. याबाबतचे पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. संदीप कुराडे, रोहन हत्ती, सुजित साजणीकर, श्वेता दड्डी, एस. आर. शिंदे, सरिता कानडे, मनीषा मोटे यांनी हे पत्रक दिले आहे.