वाचक पत्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाचक पत्र
वाचक पत्र

वाचक पत्र

sakal_logo
By

मत-मतांतरे
---------

जैवविविधता पुरवणी अभ्यासपूर्ण
‘सकाळ’च्या चंदगड विभागीय कार्यालय वर्धापन दिनानिमित्त (ता. ६ फेब्रुवारी २०२३) विशेष पुरवणी प्रसिद्ध करण्यात आली होती. चंदगड, आजरा आणि गडहिंग्लज या तिन्ही तालुक्यांतील जैवविविधता हा महत्त्वाचा व आशयपूर्ण असा या पुरवणीचा मध्यवर्ती विषय होता. हा विषय निवडल्याबद्दल ‘सकाळ’चे अभिनंदन आणि कौतुक करावेसे वाटते. कारण, जनसामान्यांना आवश्यक व तितक्याच अनभिज्ञ अशा या विषयाची तिन्ही तालुक्यांत खरोखर गरज होती. जैवविविधतेने नटलेल्या, सदाहरित जंगले, घनदाट वर्षावाने, विविध पशुपक्ष्यांचे आश्रयस्थान असलेल्या या सह्याद्रीच्या कोंदणात वसलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड, आजरा व गडहिंग्लज हे तीन तालुके. येथील निसर्गसंपदा, वन्यजीवसंपदा म्हणजे सह्याद्रीचा जीव की प्राण आहेत. या परिसरातील प्राणी, पक्षी, कीटक, वृक्ष यांची वन्यजीवसंपदा खरोखरच थक्क करणारी आहे. आजही त्यांच्या नव्या-नव्या प्रजाती सापडत आहेत. आज आपल्या सह्याद्रीच्या जंगलात जगातील दुर्मिळातील दुर्मिळ असे अनेक प्राणी वास्तव्यास आहेत, ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. जैवविविधता जपणे व तिचा सांभाळ करणे, ही सर्वांच्या दृष्टीने काळाची गरज आहे. या पुरवणीतील सर्व लेख हे खूप अभ्यासपूर्ण व सूक्ष्मनिरीक्षणातून लिहिलेले आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांना जैवविविधता आणि त्यातील महत्त्वाचे घटक याची इत्थंभूत माहिती समजली व या सर्व घटकांशी ओळख झाली. आगामी काळात ‘सकाळ’ने निसर्गातील अशा वैविध्यपूर्ण विषयांवर प्रकाश टाकावा, तसेच निसर्ग आणि पर्यावरणातील महत्त्वाच्या व अत्यावश्यक घटकांवर सर्व वाचकांना नवीन विषयांवरील वाचनाची पर्वणी द्यावी.
अभिजित वाघमोडे, चंदगड (जि. कोल्हापूर)