
विद्यापीठ भुयारी मार्ग
विद्यापीठाचा पूर्व व पश्चिम
भाग जोडण्यासाठी भुयारी मार्ग
आठ कोटी ८१ लाखाचा निधी मंजूर
कोल्हापूर, ता. १६ ः शिवाजी विद्यापीठाच्या पूर्व व पश्चिम भाग कायमस्वरूपी जोडण्यासाठी भुयारी मार्ग बांधण्यास शासनाने मंजुरी दिली. या कामासाठी आजच आठ कोटी ८१ लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला. उच्च व तंत्र शिक्षण विभागाने या संदर्भातील आदेश आज काढले.
विद्यापीठाचा सुमारे ८५३ एकराचा विस्तीर्ण परिसर महापालिकेच्या ताब्यात असलेल्या जुन्या पुणे-बंगळूर महामार्गाच्या पूर्व व पश्चिम बाजूस विभागला आहे. या जुन्या महामार्गाचे चार पदरीकरण झाले आहे, त्याशिवाय रस्त्यावर दुभाजक आहेत. पुटपाथ व अन्य रस्ता मिळून ३३ मीटरचे रूंदीकरण झाले आहे. विद्यापीठाच्या पश्चिम भागात मुख्य प्रशासकीय इमारतीसह विविध अधिविभागाच्या इमारती, क्रीडा संकुल तर पूर्व भागात विद्यापीठाचा तंत्रज्ञान, स्कुल ऑफ नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजी, श्री. शाहू रिसर्च सेंटर, शिक्षणशास्त्र आदी विभाग आहेत.
भविष्यात पूर्व भागात यशवंतराव चव्हाण स्कुल ऑफ रूरल डेव्हलपमेंट आदी इमारतीचे बांधकाम प्रस्तावित आहे. विद्यापीठातील विद्यार्थी, पालकांसह सुमारे दोन ते तीन हजार लोक मुख्य रस्त्यावरून दररोज पूर्व व पश्चिम भागात ये-जा करतात. या मार्गावरील वाहनांची वाढती संख्या व त्यामुळे होणाऱ्या संभाव्य अपघाताच्या पार्श्वभूमीवर पुर्व व पश्चिम विभागाला जोडणारा भुयारी मार्ग विद्यापीठाने प्रस्तावित करून त्यासाठी निधीची मागणी केली होती. त्यासाठी आठ कोटी ८१ लाख रूपयंची मागणी केली होती. या मागणीला अनुसरून उच्च व तंत्र शिक्षण विभागाने भुयारी मार्गासाठी हा निधी मंजूर केला.