
इचलकरंजीच्या खेळाडूंचे यश
इचलकरंजीच्या खेळाडूंचे यश
इचलकरंजी : अकलूज येथे झालेल्या शालेय राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत इचलकरंजी येथील खेळाडूंनी यश मिळविले. इंडियन राउंड प्रकारात वरदान गणेश मांगलेकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. रिकर्व राउंड प्रकारात कुणाल फाटक यांनी तृतीय क्रमांक मिळविला. इचलकरंजीतून प्रथमच धनुर्विद्या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांची निवड झाली होती. यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशिक्षक शिवम स्वामी यांचे मार्गदर्शन लाभले.
-----------
चौगुले विद्यामंदिरमध्ये पालक मेळावा
इचलकरंजी : डॉ. जया आदिनाथ चौगुले प्राथमिक विद्यामंदिर, आदिनाथ पिरामा केटकाळे बालमंदिर व शिशुगट यांच्या संयुक्त विद्यमाने दुसऱ्या सत्रातील पालक मेळावा झाला. संस्थेचे अध्यक्ष डॉ. पी. जे. बडबडे अध्यक्षस्थानी होते. प्रा. मृदुलता पाटील यांनी वेळेचे मोल व आपल्या पाल्याविषयी सतर्क राहण्याविषयी मार्गदर्शन केले. सी. डी. लडगे यांनी स्वागत केले. तीर्थकर माणगावे यांनी प्रास्ताविक केले. रवींद्र पाटील यांनी संस्था व शाळेविषयी माहिती सांगितली. मुख्याध्यापिका वर्षा हुल्ले, सुवर्णा ऐनापुरे, नम्रता जोशी उपस्थित होत्या.
----------------------
शाहू हायस्कूलमध्ये मार्गदर्शन शिबिर
इचलकरंजी : राजर्षी छत्रपती शाहू हायस्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘परीक्षेला सामोरे जाताना’ या विषयावर मार्गदर्शन शिबिर झाले. मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेस आत्मविश्वासाने सामोरे जा, कॉपीमुक्त परीक्षा द्या, भावी जीवनाचा पाया दहावी आहे, तो मजबूत करा, असे सांगितले. उल्हास पुजारी, सोमनाथ रसाळ, मुख्याध्यापक शंकर पोवार, अलका शेलार उपस्थित होते. यू. पी. जाधव यांनी सूत्रसंचालन केले. पी. ए. पाटील यांनी आभार मानले.