रत्नागिरी ःवारीशेच्या हत्येचा कट रत्नागिरीत बंगल्यावर शिजला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ःवारीशेच्या हत्येचा कट रत्नागिरीत बंगल्यावर शिजला
रत्नागिरी ःवारीशेच्या हत्येचा कट रत्नागिरीत बंगल्यावर शिजला

रत्नागिरी ःवारीशेच्या हत्येचा कट रत्नागिरीत बंगल्यावर शिजला

sakal_logo
By

पान १
83480


वारीशेंच्या हत्येचा कट रत्नागिरीत शिजला
---
खासदार संजय राऊत; राजकीय हत्यांचे लोण आले सिंधुदुर्गातून
रत्नागिरी, ता. १७ ः पत्रकार शशिकांत वारीशे मृत्यू प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल आहे. हा खून थरकाप उडविणारा आहे. अशा प्रकारच्या हत्या झाल्यास हे बिहार आहे का, असे उदाहरण दिले जात होते. आता महाराष्ट्राचे नाव घेतात, ही दुर्दैवी बाब आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजकीय हत्यांची परंपरा आहे. ते लोण आता रत्नागिरी जिल्ह्यातही पोचले आहे, अशी टीका शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केली. वारीशेंची हत्या हे राजकीय षडयंत्र आहे. त्याचा कट रत्नागिरीतील एका बंगल्यावर शिजला. त्यामागे अनेक बड्या नेत्यांची नावे घेतली जात आहेत, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला.
पत्रकार वारीशे यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी खासदार संजय राऊत, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आज रत्नागिरीत होते. शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेत राऊत म्हणाले, ‘‘तरुण पत्रकाराला मारण्यात आले, ही धक्कादायक घटना आहे. महाराष्ट्राला आणि देशाला रत्नागिरी जिल्ह्याने लोकमान्य टिळक, बाळशास्त्री जांभेकर दिले. त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत झालेला प्रकार निंदनीय आहे. भूमिका पटत नाही, तर एखाद्याला चिरडून मारले जाते, हे बिहार आहे का? एकीकडे हे प्रकरण घडले असताना उपमुख्यमंत्री सिंधुदुर्गात येऊन रिफायनरी प्रकल्प होणारच, अशी घोषणा करतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय हत्यांचे लोण आता रत्नागिरीत आल्याचे दिसते. तपासासाठी जी टीम नेमली आहे, त्यातील अधिकारी कोणाचे आहेत? यंत्रणा निःपक्ष आहे का?
संशयिताचे कोणाशी लागेबांधे आहेत का, याचा तपास व्हावा, अशी मागणी करून राऊत म्हणाले, ‘‘हा अपघात झाला, तेव्हा तिन्ही ठिकाणचे सीसीटीव्ही बंद होते. हा योगायोग आहे का? पंपावरील आठ कर्मचाऱ्यांचा जबाब घेऊ नये म्हणून दबाव आणला जातो. जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणतात, हा प्लॅन करून खून केला, मग प्लॅनमध्ये कोण आहेत? त्यांच्यापर्यंत यंत्रणा का नाही पोचली? रिफायनरी प्रकल्पासाठी अनेकांचे बेनामी व्यवहार आहेत. वारीशेंच्या आईचा आणि मुलाचा आक्रोश शासनाने ऐकला नाही. त्याला शासनाने ५० लाख रुपये मदत दिली पाहिजे. प्रकल्प लोकांनी स्वीकारला तर आम्हाला मान्य असेल.’’
आमदार राजन साळवी, संपर्कप्रमुख मोरे, जिल्हाप्रमुख विलास चाळके, तालुकाप्रमुख बंड्या साळवी आदी उपस्थित होते.

पुढचा रत्नागिरीचा
आमदार सेनेचाच
सत्तासंघर्षाबाबत आमच्या वकिलाने न्यायालयात भक्कम बाजू मांडली आहे. खरी सेना काय आहे हे लोकं ठरवतील. त्यासाठी निवडणुका होऊन जाऊदेत. २०२४ मध्ये देश आणि राज्यात परिवर्तन होणारच. जे कोणी हौशेनौशे गेले, त्याने सेनेला काही फरक पडत नाही. त्यांचे परतीचे मार्ग आता कायमचे बंद झाले आहेत. पुढच्या विधानसभा निवडणुकीत रत्नागिरीचा आमदार सेनेचाच असेल, असा दावा राऊत यांनी केला.

मला तुरुंगात मारण्याचा प्रयत्न
खोट्या गुन्ह्याखाली आपल्यालाही तुरुंगात पाठविले आणि तेथे आपल्याला मारण्याचा प्रयत्न झाला. योग्य वेळ आल्यावर यावर विस्तृत बोलेन, असे सांगत देशात, राज्यात आणीबाणीपेक्षाही भयंकर स्थिती असल्याचा आरोप राऊत यांनी केला.