
आजरा ः कोरीवडे काजू बागा जळाल्या
कोरिवडेत वणव्यात काजूच्या बागा जळाल्या
आजरा, ता. १७ ः कोरिवडे (ता. आजरा) येथे गुरुवारी (ता. १६) लागलेल्या वणव्यात काजूच्या फळबागा जळाल्या. त्याचबरोबर वीस गवत गंज्या वणव्यात जळून गेल्या आहेत. आगीचे नेमके कारण समजलेले नाही. पन्नास एकरचा परिसर जळून गेला असून सुमारे दहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
काल दुपारी दोनच्या सुमाराला उन्हाचा तडाखा, वाळलेला पालापाचोळा व गवताने वणवा सर्वत्र पसरला. सुमारे पन्नास एकरचा परिसर वणव्यात खाक झाला. यामध्ये शिवाजी पाटील, नेताजी पाटील, बाबासो पाटील, शिवाजी पाटील, यशवंत पाटील, विश्वनाथ पाटील, दिगंबर पाटील, श्रीपती पाटील, मारुती पेडणेकर, नामदेव पेडणेकर, शिवाजी पांडुरंग पाटील, तानाजी महादेव पाटील, नामदेव पेडणेकर, मारुती मिसाळे या शेतकऱ्यांच्या काजू फळबागांचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर त्यांच्या वीस गवत गंज्या जळाल्या आहेत. काजूला नुकताच मोहर येऊन त्या बहरल्या होत्या. वणव्यात झाडांना झालेली फळधारणा जळून गेली आहे. त्यामुळे काजू उत्पादनावर परिणाम होणार आहे.