
सुमंगलम महोत्सवात माध्यमिकचा सहभाग
83705
...
सुमंगलम लोकोत्सवात माध्यमिक शिक्षणचा सहभाग
प्रचार प्रसिद्धीसह केले धान्यांचेही संकलन
कोल्हापूर, ता. १८ : कणेरी मठाच्या वतीने आयोजित सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवात माध्यमिक शिक्षण विभागाकडे विविध जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या आहेत. यात लोकसहभाग वाढवण्यासाठी जनजागृती करण्यासह, प्रचार व प्रसिद्धीचे काम विभागाकडून करण्यात आले आहे. तसेच पालकांकडून जुन्या साड्या, ताट, वाटी, ग्लास, कडधान्य, डाळ व वेस्टेज प्लास्टिक, इत्यादी वस्तू दान स्वरूपात गोळा करण्यात आले असल्याची माहिती शिक्षणाधिकारी (माध्यमिक) एकनाथ आंबोकर यांनी दिली.
विभागाकडे देण्यात आलेल्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सर्व संघटनांची एकत्रित सभा घेऊन साहित्य गोळा करण्यासंदर्भात आवाहन केले. तसेच जिल्ह्यात माध्यमिक शाळांच्या ९१ सहविचार मंचाच्या मुख्याध्यापकांची सभा घेऊन साहित्य गोळा करण्याबाबत नियोजन करण्यात आले. माध्यमिक शाळांतील मुले, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, मुख्याध्यापक तसेच सर्व संघटना पदाधिकारी यांनी याला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये साहित्य गोळा केल्याची माहिती श्री. आंबोकर यांनी दिली.
या उपक्रमात ७२५ शाळांनी सहभाग घेतला. या शाळांनी दान स्वरुपात ५४ हजार २९ साड्या, ताटे (२७५१८), वाटी (२६६२८), ग्लास (१९२५६), तसेच मूग (३९८३.९१ किलो), तुरडाळ (५६३० किलो), वेस्टेज प्लास्टिक (८५२४ किलो), तांदूळ (३६०६.८ किलो), गहू (१०२८ किलो), मूगडाळ (४२५ किलो), चादर किंवा ब्लॅंकेट (६०) आदी साहित्य दान स्वरूपात ग्रामस्थांकडून गोळा करण्यात आले. ‘माध्यमिक’च्या कामाबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण व अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी यांनी विभागाचे कौतुक केले आहे.