मुश्रीफ पत्रक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुश्रीफ पत्रक
मुश्रीफ पत्रक

मुश्रीफ पत्रक

sakal_logo
By

जिल्हा बँकेप्रश्‍नी अजित पवारांसोबत अमित शहांना भेटणार

आमदार हसन मुश्रीफ ः बँकेबाबत माहिती देऊन करणार सर्व शंकांचे निराकरण

कोल्हापूर, ता. १८ ः केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांना महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत लवकरच वेळ घेऊन भेटणार असल्याचे आमदार हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे. या भेटीत जिल्हा बँकेबाबत सर्व ती माहिती देऊन त्यांच्या मनातील सर्व शंकांचे निराकरण करणार असल्याचे, त्यांनी पत्रकात म्हटले आहे.
पुणे येथे आज झालेल्या कार्यक्रमात श्री. शहा यांनी आपल्या भाषणात सोलापूर, नागपूर आणि कोल्हापूर अशा तीन जिल्हा मध्यवर्ती बँकांवर प्रशासक नेमावा लागल्याचा उल्लेख केला आहे. कदाचित यापूर्वी बँकेवर प्रशासक नेमला होता, या संदर्भाने त्यांचे ते वक्तव्य असावे. केडीसीसी बँक ही कोल्हापूर जिल्ह्यातील दहा ते पंधरा लाख शेतकऱ्यांची बँक आहे. बँकेच्या सभासद शेतकऱ्यांमध्ये गैरसमज होऊ नये म्हणून हे स्पष्टीकरण देत असल्याचे श्री. मुश्रीफ यांनी पत्रकात म्हटले आहे.
भाषणामध्ये बोलण्याच्या ओघामध्ये त्यांनी गैरसमजातून कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे नाव घेतले असावे, असे माझे प्रामाणिक मत आहे. कारण, आठ वर्षांपूर्वी कोल्हापूर जिल्हा बँकेवर प्रशासक होता. नागपूर आणि सोलापूर बँकांवर आजही प्रशासक आहेत. गेल्या आठ वर्षांमध्ये केडीसीसी बँकेने नेत्रदीपक प्रगती केलेली आहे. सातत्याने ‘अ’ प्लस असा ऑडिट वर्ग असून दीडशे कोटींहून अधिक नफा आहे. गेल्या आठ वर्षांत बँकेची चौकशी झालेली नाही. दरवर्षी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, नाबार्ड, सहकार विभाग यांच्या तपासण्या व वैधानिक लेखापरीक्षण नियमितपणे होत असते. उद्या (ता. १९) श्री. शहा हे कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. माझी त्यांना विनंती आहे, या बँकेबाबत त्यांनी अधिकची माहिती घ्यावी. तसेच, बँकेच्या संचालक मंडळ किंवा संबंधित अधिकाऱ्यांना जर त्यांनी वेळ दिली, तरीसुद्धा आम्ही त्यांचा गैरसमज दूर करू व त्यांच्या मनातील सर्व शंकांचे निराकरण करू, असे या पत्रकात म्हटले आहे.
.......