
चित्रनगरीचा आराखडा सादर करा ः विकास खरगे
83725
...
चित्रनगरीचा बृहत आराखडा सादर करा
प्रधान सचिव विकास खारगे यांची सूचना
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १८ ः चित्रनगरी प्रशासनाने महसूल वाढीच्या तसेच पर्यटनाच्या दृष्टीने चित्रनगरीचा बृहत आराखडा बनवावा. यामध्ये मॅजिक स्टुडिओसह पर्यटन स्थळे, चित्रिकरणासाठी मोकळे भूखंड, वसतिगृहे यांचा समावेश करावा. या आराखड्याचा प्रस्ताव लवकरात लवकर शासनाला पाठवावा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी आज दिले. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह चित्रनगरीची पाहणी केली.
या वेळी श्री. खारगे यांनी चित्रनगरी येथे उभारण्यात आलेल्या विविध चित्रीकरणस्थळांना तसेच कोल्हापूर चित्रनगरीमध्ये सध्या सुरू असलेल्या ‘संत गजानन शेगाविचे’ आणि ‘सुंदरी ’ या मराठी मालिकांच्या सेटवर भेट दिली. त्यावेळी कोल्हापूर चित्रनगरीमध्ये नव्याने तयार करावयाच्या वाडा, चाळ, मंदिर, शंभर बाय ९० फूट आकाराचा स्टुडिओ, वसतिगृह, रेल्वे स्थानक, बंगला या प्रस्तावित चित्रीकरणस्थळांचा आढावा घेऊन त्यांनी मार्गदर्शक सूचना दिल्या. तसेच एकूण ७८ एकर क्षेत्रफळामध्ये १५० बाय १०० फूट आकाराचा मॅजिक स्टुडिओ, चित्रीकरणाकरिता एक एकर क्षेत्रफळाचे मोकळे भूखंड, चित्रीकरण स्थळे, पर्यटनस्थळे, २० खोल्यांची २ वसतिगृहे यांचा समावेश असणारा बृहत आराखडा बनवावा, अशा सूचना दिल्या.
यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, कोल्हापूर चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक संजय पाटील, रामोजी फिल्म सिटीचे संचालक राजीव जालनापरकर, प्रकल्प व्यवस्थापक दिलीप भांदिगरे आणि वास्तुविशारद इंद्रजित नागेशकर उपस्थित होते.