
शिवजयंती
83952, 83954
थाट शिवजयंतीचा, उत्साह शिवभक्तांचा..!
सामाजिक उपक्रमांची जोड देत तरुणाईची शिवरायांप्रती कृतज्ञता
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १९ : वीरश्रीयुक्त पोवाडे, शिवज्योत घेऊन आलेले कार्यकर्ते व बालचमूंचा उत्साह, अशा वातावरणात शहर परिसरात शिवजयंती थाटामाटात साजरी झाली. सामाजिक उपक्रमांची जोड देत तरुणाईने शिवरायांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. भिरभिरणारे भगवे झेंडे, बाराबंदी पोशाखातील मावळे, शिवकालीन युद्धकलेच्या थरारात काढण्यात आलेल्या मिरवणुकांनीही लक्ष वेधले. निमित्त होते शिवजयंती उत्सवाचे.
शहर परिसरात ठिकठिकाणी उभारलेल्या मंडपात पहाटेपासूनच कार्यकर्त्यांची लगबग सुरू झाली. उपनगरातील बालचमू शिवज्योत आणण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकात रवाना झाले. ‘जय भवानी जय शिवाजी,’ ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय,’ ‘तुमचं आमच नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय,’ घोषणांनी त्यांनी परिसर दणाणून सोडला. किल्ले पन्हाळगडावरून शिवज्योत घेऊन कार्यकर्ते आपापल्या गावी रवाना झाले. ध्वनिक्षेपकावर ठिकठिकाणी पोवाड्यांसह शिवचरित्रावर आधारित गीते लावल्याने सकाळचे वातावरण रोमांचित झाले होते.
छत्रपती देवस्थान चॅरिटेबल भवानी मंडप ते नर्सरी बाग अशी पालखी मिरवणूक काढण्यात आली. त्यात भालदार-चोपदारांचा समावेश होता. मालोजीराजे छत्रपती व यशस्विनीराजे यांच्या हस्ते मंदिरातील शिवछत्रपतींच्या पुतळ्याचे पूजन झाले. शाहीर आझाद नायकवडी यांनी ‘प्रजाहितदक्ष छत्रपती शिवाजी महाराज’ या विषयावर पोवाडा सादर केला.
छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी शिवजन्मकाळ सोहळा झाला. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, खासदार प्रा. संजय मंडलिक, आमदार सतेज पाटील, आमदार जयश्री जाधव, महापालिकेच्या प्रशासक कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते पुतळ्याचे पूजन झाले. यावेळी आर. के. पोवार, वसंतराव मुळीक, सचिन चव्हाण, किशोर घाटगे, अनिल घाटगे, दिलीप पवार, कादर मलबारी, आदिल फरास उपस्थित होते.
संभाजी ब्रिगेडतर्फे रेल्वे स्थानकावरील प्रवाशांना साखर-पेढे वाटप करत शिवजयंती तयारी केली. कलानगरी शिवगर्जना पथकाने पोवाड्यांच्या माध्यमातून प्रवाशांचे प्रबोधन करण्यात आले. यावेळी पोलिस निरीक्षक संभाजी काळे, स्टेशन प्रबंधक विजयकुमार यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. जिल्हा संघटक नीलेश सुतार, संदीप यादव, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष चारुशीला पाटील, भगवान कोईंगडे, पद्माकर कापसे, विकास भिऊंगडे, अभिजित भोसले उपस्थित होते.
पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या हस्ते पोलिस मुख्यालयात शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन झाले. यावेळी पोलिस निरीक्षक सत्यवान मशालकर, विजय निकम, रोहन कुलकर्णी, मयूर कांबळे, अनिल पाटील, किशोर पवार, कुणाल घाटगे, अनिरुद्ध केसरकर उपस्थित होते.
--
चौकट
मोबाईलद्वारे फोटो घेण्यासाठी दिवसभर गर्दी
शिवाजी तरुण मंडळाने उभा मारुती चौकात उभारलेल्या शौर्यपीठावरील शिवछत्रपतींच्या पुतळ्यासमवेत मोबाईलद्वारे फोटो घेण्यासाठी शिवभक्तांची दिवसभर गर्दी होती. लहान मुली कपाळावर चंद्रकोर, भगव्या साडी नेसून आल्या होत्या, तर मुलांनी शिवरायांची वेशभूषा साकारली होती. मिरजकर तिकटीवरील मावळा कोल्हापूरच्या देखाव्यासमोरही हीच स्थिती होती. ग्रामीण भागातून आलेले शिवभक्तही येथे फोटो घेत होते.
--
चौकट
पन्हाळगडावरील पुसाटी बुरुजाची स्वच्छता
कोल्हापुरातील गडकोट गिर्यारोहक संघटनेतर्फे पन्हाळगडावरील पुसाटी बुरुजाची स्वच्छता केली. त्यास सकाळी साडेसात ते दुपारी एकपर्यंत बुरुजावरील वाढलेली झाडे-झुडपे, खंदकातील गवत, झुडपे काढली. नितीन देवेकर, मोहन पाटील, विश्वास पाटील, योगेंद्र घाटगे, भारत नेजकर, नीलेश पाटील, प्रथमेश परीट, अभिजित फल्ले, आराध्या नेजकर, अन्वी घाटगे, स्वाती पाटील, अनिता घाटगे, यश जरग यांनी यात सहभाग घेतला.