शिवाजी विद्यापीठात शिवजयंती उत्साहात साजरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवाजी विद्यापीठात  शिवजयंती उत्साहात साजरी
शिवाजी विद्यापीठात शिवजयंती उत्साहात साजरी

शिवाजी विद्यापीठात शिवजयंती उत्साहात साजरी

sakal_logo
By

83793


शिवाजी विद्यापीठात तरुणाईच्या कलाआविष्कार
कोल्हापूर, ता. १९ : शिवाजी विद्यापीठात आज शिवजयंतीचा सोहळा उत्साही वातावरणात झाला. तरुणाईचा उत्स्फूर्त सहभाग आणि कलाविष्कारांतील शोभायात्रा, लेझीम, ढोल व झांजपथकाचे त्यांनी केलेले उत्कृष्ट सादरीकरण, जरीपटक्याचे मिरविणे यामुळे विद्यापीठाचा परिसर शिवमय झाला.
सकाळी साडेआठ वाजता कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते विद्यापीठ ध्वजास वंदन करण्यात आले. या वेळी राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत, विद्यापीठ गीताचे सामूहिक गायन करण्यात आले. कुलगुरू डॉ. शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील आदींनी विद्यापीठाच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्यास पुष्प वाहून अभिवादन केले. विद्यापीठाच्या वसतिगृहातील विद्यार्थी-विद्यार्थिनींसह राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी विद्यापीठ परिसरात ढोल-ताशाच्या निनादात शोभायात्रा काढली. भगवे फेटे, शुभ्रवस्त्रांकित तरुणाईमुळे ही शोभायात्रा लक्षवेधी ठरली. शोभायात्रा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आल्यानंतर तेथे आणि मुख्य प्रशासकीय भवन इमारतीसमोर या विद्यार्थ्यांनी विविध कलाविष्कारांचे सुमारे दोन तास सादरीकरण केले.
प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, विज्ञान व तंत्रज्ञान शाखेच्या अधिष्ठाता डॉ. सरिता ठकार, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे, बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राचे प्रभारी संचालक डॉ. धनंजय सुतार, इतिहास अधिविभागप्रमुख डॉ. अवनिश पाटील, प्रल्हाद माने, प्रभंजन माने आदी उपस्थित होते.

चौकट
‘शिवरायांच्या चरित्रापासून प्रेरणा घ्या’
छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रापासून प्रेरणा घेऊन, त्यांनी दाखविलेल्या मार्गावरुन आपल्याला वाटचाल करावयाची आहे. याचे भान बाळगून या तरुणांनी देशहितासाठी स्वतःस तयार करावे, असे आवाहन कुलगुरू डॉ. शिर्के यांनी केले.