दोन मिरवणूकीत अवघे गडहिंग्लजकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दोन मिरवणूकीत अवघे गडहिंग्लजकर
दोन मिरवणूकीत अवघे गडहिंग्लजकर

दोन मिरवणूकीत अवघे गडहिंग्लजकर

sakal_logo
By

दोन मिरवणूकीत अवघे गडहिंग्लजकर
शिवजयंती : पारंपारिक वाद्यांचा दणदणाट, महिलांची मोठा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १९ : सायंकाळी सुरु झालेल्या दोन मिरवणुकांत अवघे गडहिंग्लजकर मार्गावर अवतरले. मिरवणूक मार्ग पारंपारिक वाद्यांनी दणाणून गेला. महिला, विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग, दोनशेहून अधिक चित्ररथ आणि ऐतिहासिक पोशाख परिधान केलेले कलाकार आणि पोवाड्याच्या गजराने वातावरण शिवमय झाले. गडहिंग्लजकर शिवप्रेमी शिवजयंती लोकोत्सव समिती आणि सर्वधर्मियांची सयुंक्त शिवजयंती समिती अशा या दोन मिरवणूका काढल्या. पाच तासाहून अधिक तास रात्री उशिरापर्यंत मिरवणूका सुरु होत्या.
सायंकाळी चार वाजता येथील शिवाजी चौकातून शिवप्रेमी लोकोत्सव समितीच्या मिरवणूकीला प्रारंभ झाला. त्यापुर्वी बुलेटची रॅली काढली. फटाक्यांच्या आतषबाजीने मिरवणूकीला सुरवात झाली. सजवलेल्या ट्रॅक्टरवर विविध शिक्षण संस्था, बचत गट, तरुण मंडळे यांचे चित्ररथ लक्ष वेधून घेत होते. चित्ररथात ऐतिहासिक वेशभुषा परिधान करून शिवाजी महारांजाचे जीवनातील विविध प्रसंग साकारले होते. विद्यार्थ्यांचे झांजपथक, लेझीम पथकांनी उपस्थितांना ताल धरायला लावला. नेहरू चौक, विरशैव बँक चौक, मुसळे तिकटी, एम. आर. हायस्कुल, गुणे गल्ली, शिवाजी बँक, प्रांत कार्यालय ते शिवाजी महाराज पुतळा अशी ही मिरवणूक फिरली. मिरवणूकीच्या शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनरूढ पुतळा लक्षवेधी फुलांनी सजवला होता. दसरा चौकात शिवराज्याभिषेक हे नाट्य सादर झाले. माजी नगराध्यक्षा स्वाती कोरी आणि सहकाऱ्यांनी या मिरवणूकीचे संयोजन केले.
मराठा मंडळाच्या पुढाकाराने सर्वधर्मिय शिवजयंती समितीची मिरवणूक साडेचार वाजता म. दु. श्रेष्टी विद्यालयापासून सुरु झाली. तत्पूर्वी सकाळी समितीतर्फे शिवाजी महाराज पुतळा येथे अभिषेक घातला. धनगरी ढोलपथक मिरवणूकीच्या अग्रभागी होते. फेटे परिधान केलेल्या महिलांचा मोठा सहभाग दिसला. घोड्यावर स्वार झालेले ऐतिहासिक पोषाखातील बाल कलाकार लक्षवेधक ठरले. चित्ररथातून शिवाजी महाराजांच्या कार्याची माहिती देणारे सजीव देखावे कलाकारांनी साकारले होते. वारकरी दिंडी, महाराजांची पालखी वैशिष्टपुर्ण होती. भीमनगर, शिवाजी चौक, नेहरु चौक, बसवेश्र्वर चौक मार्गे ही मिरवणूक दसरा चौकात दाखल झाली. येथे आतषबाजी करण्यात आली. आमदार हसन मुश्रीफ या मिरवणूकीत सहभागी झाले होते. माजी उपनगराध्यक्ष किरण कदम आणि सहकाऱ्यांनी या मिरवणूकीचे आयोजन केले होते.