
आमचा फॉर्म्युला ठरलेला ः देवेंद्र फडणवीस
जागा वाटपाचा फॉर्म्युला
ठरला ः फडणवीस
सर्व जागा युती करूनच लढवणार
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २० ः ‘‘राज्यातील विधानसभा आणि लोकसभा निवडणुका शिवसेना आणि भाजप यांच्या युतीच्या माध्यमातूनच आम्ही लढवणार आहोत. त्यासाठीचा आमचा फॉर्म्युला ठरला आहे. तो आम्ही योग्य वेळी जाहीर करू. या बाबतचा कोणताही संभ्रम आमच्यामध्ये नाही,’ असे स्पष्ट मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केले.
सुमंगल महोत्सवाच्या उद्घाटनासाठी ते सिद्धगिरी मठावर आले होते. महोत्सवाला जाण्यापूर्वी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी शिवसेनेला किती जागा देणार, यावर ते म्हणाले, ‘आम्ही विधानसभा आणि लोकसभा निवडणूक शिवसेना-भाजप युतीच्या माध्यमातूनच लढणार आहोत. त्यासाठी जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. योग्य वेळ येताच तो जाहीर करू. त्याबाबत कोणताही संभ्रम नाही. शिवसेनेला आम्ही पूर्वीही सन्मानपूर्वक जागा दिल्या होत्या. त्याचप्रमाणे आताही देऊ. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे की लोकसभा निवडणुकीत एन.डी.ए.च्या माध्यमातून राज्यातील ४८ जागा मोदींना मिळतील.’
आमचा कोणी शत्रू नाही
‘अमित शहा आमचे क्रमांक एकचे शत्रू आहेत,’ असे विधान उद्धव ठाकरे यांनी केले आहे. याबद्दल फडणवीस म्हणाले, ‘आमचा कोणीही शत्रू नाही. आमचे वैचारिक विरोधक आहेत. कोणाला शत्रू मानायचे आणि कोणाला कितवा क्रमांक द्यायचा, हा त्यांचा प्रश्न आहे.’