पिचकारी मुक्त इचलकरंजी कधी ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पिचकारी मुक्त इचलकरंजी कधी ?
पिचकारी मुक्त इचलकरंजी कधी ?

पिचकारी मुक्त इचलकरंजी कधी ?

sakal_logo
By

पिचकारी मुक्त इचलकरंजी कधी ?
आयुक्तांच्या आदेशाने मनपाच्या भिंती स्वच्छ; कोरोना कालावधीत घटले होते प्रमाण

संदीप जगताप : सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. 22 : आयुक्तांच्या सक्त आदेशाने इचलकरंजी महापालिका इमारत पिचकारी मुक्त झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे महापालिकेमधील रंगलेल्या भिंती स्वछ होत आहेत. मात्र हा आदेश केवळ महापालिका इमारती पुरताच का? याची अमंलबजावणी शहरासाठी का नाही? असे अनेक प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे. शहरात वाढत्या रोगराईस गुटका, मावा, पान यांच्या पिचकाऱ्या ही कारणीभूत ठरत आहेत. तसेच शहर विद्रूपीकरणात ही यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून पिचकारी मुक्त शहर हे अभियान महापालिका प्रशासनाने सुरू करणे आवश्यक बनले आहे.
शहरात २०२०-२१ मध्ये कोरोनाने हाहाकार माजवला होता. दररोज विक्रमी संख्येने रुग्ण आढळत होते. यावेळी शहरातील संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून विविध उपाययोजना सुरू केल्या होत्या. यामध्ये मावा, गुटखा, पानाचे सेवन करून सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या नागरिकांवर कारवाईचा बडगा उचलला होता. यावेळी सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास ५०० ते एक हजार रुपये दंड आकरण्यात येत होता. यामधून पालिका प्रशासनाने हजारो रुपयाचा दंड वसूल केला होता. कारवाईच्या भितीने काही प्रमाणात पिचकारी मारणाऱ्यांची संख्या कमी झाली होती. मात्र कोरोना संसर्ग कमी होत गेल्याने पिचकारी मुक्त मोहीम ही थंडावत गेली. त्यामुळे सध्या पुन्हा मावा, गुटखा, पान खाऊन सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्याचे प्रमाण वाढले आहे.
शहरात ११०० हून अधिक पानपट्टयाची खोकी सुरू आहेत. यातील काही पानपट्या केवळ माव्यासाठी प्रसिद्ध आहेत. यामध्ये मोठी गर्दी असते. त्यांच्याकडून सेवन होणारा मावा, गुटका, पाने यांच्या पिचकारी थेट रस्त्यावर होत आहे. परिणामी सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याने त्याचे संसर्गाच्या माध्यमातून भयंकर परिणाम पाहायला मिळत आहेत. परंतु याकडे दुर्लक्ष होत आहे.
--------
कारवाईची भिती नाही
राज्यात २०१२ पासून गुटखा आणि तंबाखूजन्य घटकांवर बंदी आहे. मात्र शहर आणि परिसरात गुटखा सर्वत्र सहजपणे उपलब्ध होत आहे. गुटख्याच्या वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई होताना दिसते. मात्र पुन्हा शहरातील पानपट्यांमध्ये गुटखा उपलब्ध कसा होतो?, राजरोज विक्री कशी होते? त्यांना पोलिस प्रशासनाचे भय नाही का ? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
-----------
शहरात सार्वजनिक ठिकाणी पिचकाऱ्या मारणाऱ्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याबाबतचे आदेश लवकरच काढण्यात येणार आहेत. त्यामुळे शहर पिचकारी मुक्त होणार आहे.
-सुनीलदत्त संगेवार, आरोग्य अधिकारी, इचलकरंजी महानगरपालिका