
तर विधानसभेवर धडक देणार
492५
उदगाव (ता. शिरोळ) : स्वाभिमानीतर्फे बुधवारी झालेल्या चक्काजाम आंदोलनात सहभागी राजू शेट्टी, सावकार मादनाईक, सचिन शिंदे यांच्यासह पदाधिकारी.
4924
उदगाव : चक्काजाम आंदोलनामुळे सांगली-कोल्हापूर रस्त्यावर सुमारे आठ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
तर विधीमंडळावर
धडक देवू - शेट्टी
शेतकऱ्यांसाठी ठोस भूमिका घ्या
सकाळ वृत्तसेवा
जयसिंगपूर, ता. २२ : शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकारने तातडीने ठोस भूमिका घ्यावी; अन्यथा येत्या अधिवेशनामध्ये विधीमंडळावर धडक देण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आज दिला.
संघटनेतर्फे कोल्हापूर-सांगली महामार्गावरील उदगाव टोल नाक्यावर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चक्काजाम आंदोलन झाले. शेतीची वीज कनेक्शन तोडणे थांबवा, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये दिले पाहिजेत, शेतीला दिवसा वीजपुरवठा अशा प्रमुख मागण्यात आहेत. श्री. शेट्टी म्हणाले, ‘‘राज्यात सध्या राजकीय धुळवड सुरू आहे. यात शेतकऱ्यांचे प्रश्न बाजूला पडले आहे. सत्तेत आहेत ते मजेत आहेत. विरोधात आहेत ते शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला तयार नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी जगायचे कसे, असा प्रश्न पडलाय. अडचणीतील शेतऱ्याला तुटपुंजी मदत जाहीर केली जाते पण तीही वेळेवर मिळत नाही. दुसरीकडे पीक विमा कंपन्या गब्बर झाल्या.’’
त्यांनी आरोप केला, की कंपन्यांनी हजारो कोटींचा नफा मिळवला आणि ज्या शेतकऱ्यांनी विम्याचे पैसे भरले आहेत; त्यांना मात्र उन्हातान्हात उभे राहण्याची वेळ आली आहे. गेल्या सहा वर्षांत विम्यासाठी २५ हजार कोटी भरल्याचा दावा केंद्राचा आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांना परताव्यापोटी एक हजार २५ कोटी रुपये मिळाले. त्यामुळे ही प्रधानमंत्री फसलयोजना शेतऱ्यांसाठी आहे की कार्पोरेट कंपन्यांना डल्ला मारण्यासाठी आहे?’’
एकनाथ शिंदे सरकार सत्तेवर आले आणि महाराष्ट्र शेतकरी आत्महत्यामुक्त राज्य अशी घोषणा केली; परंतु शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबायला तयार नाहीत. सध्या उन्हाळा सुरू झाला आहे. विहिरी व कूपनलिकांना पाणी आहे; मात्र विजेची कनेक्शन तोडणी जात असल्याने पिके वाळत आहेत. धरणात तयार होणाऱ्या विजेवर शेतकऱ्यांचा हक्क आहे; मग दिवसा वीज का दिली जात नाही, अशी विचारणाही त्यांनी केली.
शेतकरी १५ टक्के वीज वापरत असून ३० टक्के वीज वापरत असल्याचे खोटे रेकॉर्ड दाखवले जात असून शेतकऱ्यांना फसविले जात असल्याची आरोप शेट्टी यांनी केला.
बुधवारी साडेअकराच्या सुमारास उदगाव येथे महामार्ग रोखला. या वेळी वीज आमच्या हक्काची, शेतकऱ्यांची वीज तोडू नका, जाहीर केलेले ५० हजार रुपये द्या यांसह विविध मागण्यांबाबत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
या वेळी सावकार मादनाईक, शैलेश आडके, विठ्ठल मोरे, सचिन शिंदे, सागर मादनाईक, सागर शंभूशेट्टे, राजगोंडा पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी मागण्यांबाबत सरकारवर टीकास्त्र सोडत निषेध केला. आंदोलनामुळे सांगली-कोल्हापूर महामार्गावर सुमारे आठ किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तालुका अध्यक्ष रामचंद्र शिंदे, शैलेश आडके, सुभाष शेट्टी, शैलेश चौगुले, राजाराम वरेकर, सुनतीा चौगुले, भारती मगदूम, अजित पाटील, विशाल चौगुले, विश्वास बालिघाटे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.