
स्पर्धा परीक्षार्थींनी सोडला सुटकेचा निश्वास
स्पर्धा परीक्षार्थींनी सोडला सुटकेचा निश्वास
‘एमपीएससी’च्या निर्णयाचे स्वागत; समाधान व्यक्त
कोल्हापूर, ता. २३ ः राज्यसेवेच्या परीक्षेसाठी नवा अभ्यासक्रम २०२५ मध्ये लागू करण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) जाहीर केल्याने कोल्हापुरातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थी, परीक्षार्थींनी आज सुटकेचा निश्वास सोडला. अभ्यास आणि तयारीला चांगला वेळ मिळेल. परीक्षा देण्याची शेवटची संधी असलेल्यांना दिलासा मिळाला, अशा प्रतिक्रिया व्यक्त करत या विद्यार्थ्यांनी ‘एमपीएससी’च्या निर्णयाबाबत समाधान व्यक्त केले.
बदललेल्या नव्या पॅटर्ननुसार परीक्षा वर्णनात्मक स्वरूपात होणार आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून विद्यार्थ्यांना वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात परीक्षा देण्याची सवय लागली आहे. त्यातच एमपीएससीने अभ्यासक्रम बदलण्याचे पाऊल टाकले. यावर्षीपासून अभ्यासक्रमाचा नवा पॅटर्न लागू करण्याचे गेल्या महिन्यात जाहीर केले. त्यावर स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी आणि विविध संघटनांनी आंदोलनाचा पवित्रा घेत सन २०२५ पासून लागू करण्याची आग्रही मागणी केली. त्याची दखल एमपीएससीने घेतल्याने विद्यार्थ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
विद्यार्थी काय म्हणतात?
अभ्यासक्रम बदलून वर्णनात्मक केल्याचा एमपीएससीचा निर्णय चांगला आहे. मात्र, त्याच्या अंमलबजावणी यंदा करणे विद्यार्थ्यांसाठी योग्य नव्हते. नवा अभ्यासक्रम दोन वर्षांनी लागू करण्याचा निर्णय दिलासदायक आहे.
-स्वरूप कांबळे, बालिंगा
वर्णनात्मक आणि बहुपर्यायी परीक्षेमधील प्रश्नांचे स्वरूप भिन्न आहे. त्यामुळे नवा पॅटर्ननुसार परीक्षेची तयारी करण्यासाठी विद्यार्थ्यांना वेळ हवा होता. त्यादृष्टीने या पॅटर्नची अंमलबजावणी सन २०२५ पासून करण्याच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो.
-योगिता माने, उजळाईवाडी