पत्रकांवरील काही बातम्या एकत्रितपणे

पत्रकांवरील काही बातम्या एकत्रितपणे

रेणूका भक्त संघटनेतर्फे आवाहन
कोल्हापूर : माघ पौर्णिमेच्या सौंदत्ती यात्रेसाठी २३ ते २५ जानेवारी कालावधीत मोठ्या संख्येने एस.टी. बसचे बुकींग जिल्हा रेणुका भक्त संघटनेच्या कार्यालयात केले होते. यात्राही झाली. निपाणी आगाराने हिशेब पूर्ण करुन परतावा रकमेचे वाटप दुधाळी येथील संघटनेच्या कार्यालयात २७, २८ ला सकाळी ११ ते सायंकाळी ५ पर्यंत करण्यात येईल, असे संघटनेस कळविले आहे. त्यानुसार ज्या गाडी प्रमुखांनी निपाणीस न जाता संघटनेच्या कार्यालयात गाडी बुक केलेली आहे. अशा गाडी प्रमुखांनी संबंधित दिवशी आणि वेळेत भरलेल्या रकमेची पावती दाखवून अनामत रक्कम घेऊन जावे, असे संघटनेचे अध्यक्ष युवराज मोळे, सरचिटणीस अच्युत साळोखे यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.
...
न्यू कॉलेजची निवड
कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय शिखर संस्था ‘जी-२०’तर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘वाय-२०’ उपक्रमाचे यजमानपद भारताकडे आहे. या उपक्रमाच्या अंतर्गत भारतातील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये आंतरराष्ट्रीय बैठका होणार असून, यामध्ये उद्योगांचे भविष्यातील कामकाज, हवामान बदल, आपत्ती व्यवस्थापन, शांतता निर्माण आणि समेट, स्वास्थ्य, कल्याण आणि खेळ, लोकशाही आणि शासनातील युवकांचा सहभाग यावर मत मांडण्याची महाविद्यालयातील पाच विद्यार्थ्यांना संधी दिली जाणार आहे. राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय शिखर संस्था ‘जी-२०’च्या सदस्यांशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. या ‘वाय-२०’ उपक्रमात सहभागी होण्याकरिता महाराष्ट्र शासनाच्या वतीने निवडक महाविद्यालयांत जिल्ह्यातून श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित न्यू कॉलेजचा समावेश आहे.
...
न्यू कॉलेजमध्ये कार्यशाळा
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या अग्रणी महाविद्यालय योजनेच्या डी. आर. के. कॉमर्स कॉलेज क्लस्टर अंतर्गत एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन न्यू कॉलेज रसायनशास्त्र विभागाच्या वतीने केले. ‘रसायनशास्त्रातील उपयोजित संशोधन : प्रगतशील समाजाची गरज’ विषयावरील कार्यशाळेचे उद्‌घाटन डॉ. जे. बी. यादव यांच्या हस्ते झाले. प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील अध्यक्षस्थानी होते. डॉ. यादव यांनी संशोधनातील बौद्धीक संपदा हक्काचे महत्त्व, पेटंट्सविषयी माहिती दिली. दुसऱ्या सत्रात डॉ. व्ही. व्ही. डावकर (मिटकॉन पुणे) यांनी ''विज्ञान : शिकण्यासाठी की जगण्यासाठी'' यावर मार्गदर्शन केले. यामध्ये त्यांनी भारताची वैज्ञानिक प्रगती, कृषी, आहार, आरोग्य यातील वैज्ञानिक दृष्टीकोनाबाबत विवेचन केले. तिसऱ्या सत्रात डॉ. ए. एच. गोरे (उका तरसादिया विद्यापीठ, सुरत) यांनी ''पाणी व सांडपाणी यावरील शाश्वत प्रकिया'' यावर सध्या सुरू असलेल्या संशोधनावर आणि त्याच्या वापराबाबत माहिती दिली .
अग्रणी महाविद्यालय क्लस्टरमधील सुमारे ९० विद्यार्थी, प्राध्यापक सहभागी झाले. समन्वयक म्हणून डॉ. व्ही. आर. मोरे यांनी काम पाहिले. श्रीमती जे. एस. क्षीरसागर, डॉ. ए. डी. चौगले, डॉ. एन. व्ही. पवार यांचे मार्गदर्शन आणि डॉ. व्ही. डी. जाधव, डॉ. के. सी. राठोड, एस. आर. सोनवणे यांचे सहकार्य लाभले.
...
‘अवनि’तर्फे मोफत आरोग्य शिबिर
कोल्हापूर : अवनि स्थलांतरित विकास प्रकल्प व वीटभट्टी, साखर आनंद डे केअर सेंटर उपक्रमांतर्गत कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील वीटभट्टी, ऊसतोड मजुरांच्या बालकांसाठी डे केअर सेंटर २७ ठिकाणी सुरू आहेत. येथील ४५३ बालके शिक्षण घेतात. या बालकांसह पालकांची आरोग्य तपासणी अवनि संस्थेतर्फे केली. आरोग्य शिबिरामध्ये ३६९ बालकांची तसेच १४६ पालकांची तपासणी केली. डॉक्टरांनी सर्दी, ताप, खोकल्यासह, खरुज, अशक्तपणा, एच.बी. प्रमाण अशा वैद्यकीय तपासण्या केल्या. मोफत औषधे दिली. जाधववाडी, सरनोबतवाडी, साबळेवाडी, दोनवडे, वाकरे, कुडित्रे, दोनवडे येथील वीटभट्टी कार्यस्थळावर आणि राजाराम कारखाना, कुंभी कारखाना येथील कार्यस्थळावर पालकांची आणि विद्यार्थ्यांची आरोग्याची तपासणी केली. आरोग्य शिबिरासाठी खुपिरे ग्रामीण रुग्णालयातील डॉ. शरद तावडे, डॉ. श्रद्धा पाटील, शीतल पाटील, डॉ. निरंजन मिटबावकर, डॉ. अमरसिंह रजपूत यांचे सहकार्य मिळाले. अध्यक्षा अनुराधा भोसले यांचे मार्गदर्शन लाभले. साताप्पा मोहिते, अमर कांबळे, रविंद्र कुराडे यांनी नियोजन केले.
...
85080
कोल्हापूर : राज्यस्तरीय स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांसमवेत शिक्षक.

शाहू महाराज हायस्कूलचे राज्यस्तरीय स्पर्धेत यश
कोल्हापूर : सातारा येथे झालेल्या शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये शाहू महाराज हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनी यश मिळवले. सुगम गायन स्पर्धेमध्ये प्राथमिक गटात (द्वितीय) निरज सपाटे, उच्च माध्यमिक गटात (तृतीय) वैष्णवी जाधव, वक्तृत्व स्पर्धेत माध्यमिक गटात (द्वितीय) केतकी नाकाडी, उच्च माध्यमिक गटात (द्वितीय) रामेश्वरी बंगडे, निबंध स्पर्धेत प्राथमिक गटात (प्रथम) राजवीर केळुसकर, गुरुदेव कार्यकर्ते गटात वकृत्व स्पर्धेत (प्रथम) अमित कांबळे, चित्रकला स्पर्धेत (तृतीय) राजेंद्र काकडे यांनी यश मिळवले. संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सहसचिव आर. व्ही. शेजवळ, सातारा विभाग प्रमुख अरूण कुंभार, आजीव सेवक कोल्हापूर विभाग प्रमुख आणि विद्या समिती अध्यक्ष श्रीराम साळुंखे यांच्या उपस्थितीत स्पर्धा झाल्या.
...
85086
कोल्हापूर : प्रा. संजयकुमार मेणशी यांना सन्मानित करताना उपस्थित मान्यवर.

प्रा. मेणशी यांचा सत्कार
कोल्हापूर : गोपाळ कृष्ण गोखले महाविद्यालयातील भूगोल विभाग प्रमूख प्रा. संजयकुमार मेणशी यांना कोकण जिऑग्राफर्स असोसिएशन ऑफ इंडियातर्फे के.जी.अ.आय नॅशनल अॅवार्ड देऊन सन्मानित केले. भूगोल विषयासंदर्भातील राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये त्यांनी अनेक शोध, निबंध सादर केले असून, पर्यावरण क्षेत्रातील कार्य तसेच विविध संस्थांसमवेत केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार शिवराम ठाकूर यांच्या हस्ते दिला. प्रा. मेणशी यांचे शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा. जयकुमार देसाई यांनी अभिनंदन केले. प्रा. डॉ. मंजिरी मोरे, पेट्रन कौन्सिल मेंबर दौलत देसाई, प्राचार्य डॉ. आर. बी. भुयेकर, कौन्सिल मेंबर प्रा. पी. बी. झावरे, सर्व प्राध्यापकांचे प्रोत्साहन लाभले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com