
हसन मुश्रीफांवर गुन्हा दाखल
फोटो- ६५१
हसन मुश्रीफ- 5722
मुश्रीफांविरोधात गुन्हा दाखल
---
४० कोटींच्या फसवणुकीची फिर्याद; ‘राष्ट्रवादी’चे कार्यकर्ते आक्रमक
सकाळ वृत्तसेवा
मुरगूड, ता. २४ : सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यात फिर्यादी व इतर लोकांना भागभांडवल देतो, असे म्हणून फसवणूक केल्या प्रकरणी आज आमदार हसन मुश्रीफ यांच्याविरोधात येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यांनी तब्बल ४० कोटींची फसवणूक केल्याची फिर्याद विवेक विनायक कुलकर्णी (रा. कागल) यांनी दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल केल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक विकास बडवे यांनी पत्रकारांना दिली.
पोलिसांनी याबाबत दिलेली माहिती अशी ः बेलेवाडी काळम्मा (ता. कागल) येथील या कारखान्यात २०१२ ते आजअखेर हा गुन्हा घडला आहे. मुश्रीफ यांनी २०१२ च्या सुमारास कारखाना उभारणीसाठी सभा, संमेलनाच्या माध्यमातून सभासद, भागधारक होण्याचे खुले आवाहन केले होते. त्यातून लोकांकडून दहा हजार रुपयांप्रमाणे शेअर भांडवल घेतले व सुमारे ४० कोटींची फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, खोटी व बदनामी करणारी फिर्याद दाखल केल्याचे सांगत ‘राष्ट्रवादी’च्या कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्यातच ठाण मांडले. त्यामुळे तेथे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
कारखान्यात कुलकर्णींसह अन्य सभासदांना मासिक पाच किलो साखर, तसेच लाभांश रूपात अन्य आर्थिक लाभ मिळतील, अशी प्रलोभने दाखविण्यात आली. कारखाना सुरू झाल्यावर साखर कार्ड बिगर ऊस उत्पादक या सदराखाली देण्यात आले. विवेक कुलकर्णी व साक्षीदार यांना कोणतीही पावती, शेअर सर्टिफिकेट दिले नाही. त्यामुळे त्यांनी चौकशी केली असता त्यांना सरसेनापती शुगर ‘एलएलपी’ या नावाने पोच पावत्या देण्यात आल्या. ‘नॉन क्युम्युलेटी व प्रेफरेंशियल शेअर्स’ या सदराखाली या पोच पावत्या दिल्याचे दिसून आले. कारखाना उभा करताना रोख, धनादेश स्वरूपात कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कागलमधील शाखा क्रमांक एक व दोनमधून त्यांच्या कुटुंबीयांच्या व्यक्तिगत तसेच सरसेनापती शुगर पब्लिक लिमिटेड (नियोजित)च्या नावाने आमच्याकडे भाग देतो, असे सांगून पैसे गोळा केलेले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
आमदार मुश्रीफ यांनी त्यांच्या राजकीय पदाचा व वर्चस्वाचा गैरफायदा घेत गोरगरीब लोकांना व शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. कारखाना केवळ मुश्रीफ कुटुंबीय व त्यांचे नातेवाईक, संबंधित व्यक्ती अशा एकूण १७ जणांचा खासगी आहे. त्यांच्याशी संबंधित १२ अन्य कंपन्यांच्या मालकीचा असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार गुन्हा दाखल केल्याचे बडवे यांनी सांगितले.
पोलिस ठाण्यातच
कार्यकर्त्यांचा ठिय्या
दरम्यान, आमदार मुश्रीफ यांच्याविरोधात तक्रार दाखल झाल्याची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, तसेच काही शेतकरी मुरगूड पोलिस ठाण्यावर चालून आले. खोटी, चुकीची व बिनबुडाची तक्रार शहानिशा न करता कशी दाखल करून घेतली, त्यासाठी कोणती कागदपत्रे पुरवण्यात आली, असा जाब सहायक निरीक्षक बडवे यांना विचारला. कार्यकर्त्यांनी पोलिसांवर प्रश्नांची सरबत्ती करीत धारेवर धरले; तेव्हा अधिकाऱ्यांना अक्षरशः घाम फुटला होता. संतप्त कार्यकर्त्यांनी मुरगूड पोलिस ठाण्यात हुकूमशाही सुरू झाल्याचा आरोप केला. आमदार मुश्रीफ यांच्याविरोधात एक व्यक्ती ४० कोटींची तक्रार करते आणि त्याची शहानिशा न करता गुन्हा दाखल कसा करून घेतात, सर्व ४० हजार शेतकऱ्यांनी तक्रार दिली आहे काय? १५-१६ जण येऊन ४० हजार शेतकऱ्यांची तक्रार कशी देऊ शकतात, असा जाब राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विकास पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मनोज फराकटे यांनी विचारला. आमदार मुश्रीफ यांची केवळ बदनामी करण्यासाठीचे आखलेले षडयंत्र आहे. षडयंत्रात पोलिसही सामील झाल्याची खंत या वेळी ‘राष्ट्रवादी’च्या कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली. पोलिसांच्या या कृतीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला मुरगूड पोलिस ठाणे जबाबदार असेल, असेही या वेळी कार्यकर्त्यांनी सहायक पोलिस निरीक्षक विकास बडवे यांना सुनावले.
पोलिस ठाण्यात कागदपत्रांसह जी माहिती देण्यात आली, त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
- विकास बडवे, सहायक पोलिस निरीक्षक, मुरगूड ठाणे
मग आमचीही तक्रार घ्या...
मुरगुड पोलिसांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दोन तास तत्काळ थांबून ठेवले होते. कसल्याही प्रकारची माहिती देण्यात येत नव्हती. आमदार मुश्रीफ यांच्याविरोधात खोटी तक्रार दाखल करून घेतली आहे. तशी आम्हीही तक्रार समरजितसिंह घाटगे यांच्यावर देतो; ती दाखल करून घ्या, अशी मागणी संतप्त कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांकडे केली. यावर जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे तक्रार करा, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
कारखाना मुश्रीफांजवळील १७ जणांचा
फिर्यादीने म्हटले आहे, की माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आमदार मुश्रीफ व त्यांच्या कुटुंबीय व जवळचे कार्यकर्ते यांच्यावर भ्रष्टाचाराचे तसेच आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत अनियमिततेबाबत आरोप केले आहेत. त्यातुन सक्त वसुली संचलनालय (ईडी), प्राप्तिकर विभागाकडून मुश्रीफ यांच्या कागल, मुंबई, पुणे येथील निवासस्थानी तसेच इतर ठिकाणी छापे पडले आहेत. यातून कारखाना केवळ मुश्रीफ कुटुंबीय व अन्य काही नातेवाईक, संबंधित एकूण १७ जणांचा खासगी असल्याचे दिसून येत असल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.
संकेतस्थळावरून घेतली माहिती
फिर्यादीत म्हटले आहे, की वैयक्तिकस्तरावर तसेच पब्लिक डॉरमीनमध्ये असलेल्या संकेतस्थळांवरून माहिती घेतली. त्यावरून कारखाना केवळ मुश्रीफ कुटुंबीयांशी संबंधित असलेल्या १२ व्यक्ती व नवरत्न असोसिएट एलएलपी, युनिव्हर्सल ट्रेडींग कंपनी (कागल) एलएलपी, रजत कन्झ्युमर सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड, माऊंट कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड, मारुभुमी फायनान्स ॲण्ड डेव्हलपमेंट प्रायव्हेट लिमिटेड, नेस्टगेन कन्सल्टन्सी सर्व्हिस एलएलपी, सर सेनापती शुगर एलएलपी इतक्या एलएलपी कंपनीचे व खासगी व्यक्तीची खासगी साखर कारखान्यावर मालकी आहे.