
दलित वस्ती निधी वाटपावर बैठक
जिल्हा परिषद ... लोगो
...
दलित वस्ती निधी वाटपावर बैठक
अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींच्या पी.एं.चा सहभाग
कोल्हापूर, ता. २५ : जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाच्या निधी वाटपाचा वाद न्यायालयात पोहोचला आहे. यावर १ मार्चला सुनावणी होणार आहे. हा वाद लवकर मिटण्याची चिन्हे नसल्याने, तोडगा काढण्यासाठी जिल्हा प्रशासनातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीकडे लोकप्रतिनिधींनी पाठ फिरवली. मात्र त्यांच्या पी.ए.नी. हजेरी लावली. तक्रार मागे घेण्याबाबत बैठकीत चर्चा झाली असल्याचे सांगण्यात येत आहे.
समाजकल्याण विभागाला दलित वस्ती विकासासाठी ३९ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. अनेक गावांनी प्रशासकीय,तांत्रिक मान्यता घेऊन निविदा प्रसिद्धद केल्या आहेत. तसेच काही ग्रामपंचायतींनी कामेही पूर्णत्वास नेली आहेत. मात्र दरम्यानच्या काळात पालकमंत्र्यांच्या बैठकीनंतर जिल्हा परिषदेने या कामांना स्थगिती देण्याचा निर्णय घेतला. याविरोधात माणगाव (ता. हातकणंगले) येथील कंत्राटदारांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. प्रशासकीय बाबींची पूर्तता केली असताना कामांना स्थगिती दिली असल्याकडे त्यांनी याचिकेच्या माध्यमातून लक्ष वेधले आहे. यावर १ मार्चला सुनावणी होणार आहे.
जिल्हा परिषदेच्या निधी वाटपाचा वाद पहिल्यांदा उच्च न्यायालयात गेलेला नाही. १५ वा वित्त आयोग, स्वनिधीचा वादही यापूर्वी न्यायालयात गेला आहे. या दोन्ही प्रकरणात जिल्हा परिषदेच्या माजी महिला बालकल्याण समिती सभापती वंदना मगदूम यांनी याचिका दाखल केली होती. त्यावेळी सहा महिने निधी वाटप अडकून पडले होते. या वेळीही माणगाव येथूनच याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे निधी अडकण्यापेक्षा तोडगा काढण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र लोकप्रतिनिधींना या विषयाचे गांभीर्य ध्यानात न आल्याने, त्यांनी सध्या तरी या विषयाकडे दुर्लक्ष केले असल्याचे चित्र आहे.