भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात वृध्देचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात वृध्देचा मृत्यू
भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात वृध्देचा मृत्यू

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात वृध्देचा मृत्यू

sakal_logo
By

85296 - नागव्वा कांबळे
85297
इचलकरंजी ः कुत्र्यांनी मुलाचे लचके तोडल्याने त्याची आई शनिवारी डोळ्यांत पाणी घेऊन उपचारासाठी आयजीएम रुग्णालयात धावपळ करीत होती.

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात वृद्धेचा मृत्यू
इचलकरंजीत प्रकार; सलग दोन तास लचके, बालकावरही हल्ला
सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. २५ ः येथे भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात वृद्धेचा मृत्यू झाला. नागव्वा अर्जुन कांबळे (वय ७२, रा. गोसावी गल्ली) असे त्यांचे नाव आहे. मध्यरात्री भटक्या कुत्र्यांनी सुमारे दोन ते अडीच तास लचके तोडल्याने त्या घटनास्थळी रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. पहाटेच्या सुमारास घटना निदर्शनास आल्यानंतर त्यांना आययजीएममध्ये दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा आज सकाळी सातच्या दरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, दिवसभरात भटक्या कुत्र्यांनी आणखी एका बालकावर जीवघेणा हल्ला केल्याची माहिती मिळाली.
शहरात कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्यू होण्याची ही पहिलीच घटना असली तरी महापालिका प्रशासन याचीच प्रतीक्षा करीत होते का, असा सवाल संतप्त नागरिक करीत आहेत. याबाबतची माहिती अशी ः कांबळे शुक्रवारी मध्यरात्री दोन-अडीचच्या सुमारास शौचालायसाठी घराबाहेर पडल्या होत्या. पहाटे सुमारास फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना महिला रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या. त्यांच्या आजूबाजूला भटकी कुत्री उभी होती. कुत्र्यांना हुसकावत नागरिकांनी त्यांना तत्काळ पहाटे पाचच्या सुमारास आयजीएम रुग्णालायत दाखल केले. कुत्र्यांच्या हल्यात त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना तातडीने रेबिजचे इंजेक्शन देऊन वॉर्डमध्ये दाखल केले; मात्र त्यांची प्रकृती खालावत जात होती. त्यांचा सकाळी मृत्यू झाला. दरम्यान, वृध्देचे शवविच्छेदन सुरू असतानाच कुत्र्यांनी आणखी एका लहान मुलाचा लचका तोडल्याची घटना घडली. त्यामुळे इचलकरंजी शहरात महिला व लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

पाच महिन्यांत दोन हजार जण जखमी
आयजीएममधील नोंदीनुसार पाच महिन्यांमध्ये दोन हजार नागरिकांचा कुत्र्यांनी चावा घेतला आहे. कुत्रे चावल्यामुळे दररोज किमान १४ ते १५ रुग्ण या रुग्णालयात येतात. भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी अनेक संघटनांनी आंदोलने केली; मात्र महापालिका प्रशासन केवळ कायदा पुढे करीत पळवाट काढत आहे. शहरातील बहुतांश भागांत भटक्या कुत्र्यांची दहशत आहे. या आधी निष्फळ ठरलेल्या निर्बीजीकरण मोहिमेवर महापालिका भर देत आहे; पण, भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव रोखायचा कसा, याचे उत्तर मात्र प्रशासनाकडेही नाही.