डॉ.यशवंतराव थोरात पुस्तक प्रकाशन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डॉ.यशवंतराव थोरात पुस्तक प्रकाशन
डॉ.यशवंतराव थोरात पुस्तक प्रकाशन

डॉ.यशवंतराव थोरात पुस्तक प्रकाशन

sakal_logo
By

85302
...

थोरातांच्या पुस्‍तकांतून नव्या पिढीला प्रेरणा

मंत्री चंद्रकांत पाटील ः ‘काही वाटा काही वळणं,‘ ‘नवी वाट नवे क्षितिज’ पुस्तकांचे प्रकाशन

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. २५ ः ‘नाबार्ड’चे माजी अध्यक्ष डॉ. यशवंतराव थोरात यांच्या पुस्तकांतून नव्या पिढीला प्रेरणा मिळेल. या चिंतनशील व्यक्तिमत्त्‍वाने येत्या काळातही लिहित रहावे आणि त्यातून समाजाला दिशा मिळावी, अशी अपेक्षा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली. डॉ. थोरात लिखित ‘काही वाटा काही वळणं’, ‘नवी वाट नवे क्षितिज’ या पुस्तकांचे प्रकाशन
आज त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. राजर्षी शाहू स्मारक भवनात कोल्हापूरकरांच्या तुडुंब गर्दीच्या साक्षीने तब्बल दोन तासांहून अधिक काळ हा सोहळा सजला. अध्यक्षस्थानी श्रीमंत शाहू छत्रपती महाराज होते.
सध्याच्या काळात समाजाला अशा पुस्तकांची गरज असून राज्यातील सर्व ग्रंथालयांना डॉ. थोरात यांची पुस्तके भेट म्हणून दिली जातील, असेही मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
श्रीमंत शाहू छत्रपती महाराज म्हणाले, ‘‘सद्यस्थिती पाहता भारत आता नव्या वाटेने निघाला आहे आणि ही वाट बिकट आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. थोरात यांची पुस्तके नव्या पिढीला नक्कीच प्रेरणा देतील. विविधतेतून एकता ही आपली खरी ओळख असून त्याबाबतचे अनेक पदर या पुस्तकांतून वाचकांना अनुभवायला मिळतात.’’
‘आपण या मातीत जन्मलो म्हणून भारतीय आहोत, हा विचार सर्वांत रुजावा, याच उद्देशाने लेखन केल्याचे डॉ. थोरात म्हणाले. ‘‘हल्ली जरा काही तरी झाले की भावनाशून्य माणसाच्याही भावना दुखावतात, असे चित्र आहे. राजकारणाचा विचार केला तर कोकणातून आता दशावतार आपल्याला आणण्याची गरजच नाही. या साऱ्या पार्श्वभूमीवर डॉ. थोरात यांची पुस्तके साऱ्यांनाच अंतर्मुख करतात,’’ असे अभिनेता नाना पाटेकर यांनी सांगितले.
शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी सर्वच वयोगटासाठी हे पुस्तक दिशादर्शक असल्याचे सांगितले. ‘सकाळ’ माध्यम समूहाचे संपादक संचालक श्रीराम पवार म्हणाले, ‘सकाळ’च्या सप्तरंग पुरवणीतील लेखांचा संग्रह म्हणजे ही पुस्तके आहेत. मात्र, ती लेखसंग्रह आहेत, असे म्हणता येणार नाही. कारण त्यामध्ये कथा, ललित साहित्याच्या छटा, इतिहासाबरोबरच त्यांचे विविध अनुभवही आहेत. विशेष म्हणजे एक प्रगल्भ समुपदेशक म्हणून ती सर्वांनाच मार्गदर्शक आहेत.’’
रिझर्व्ह बॅंकेच्या माजी डेप्युटी गव्हर्नर उषा थोरात व्यासपीठावर उपस्थित होत्या. अनुबंध प्रकाशनचे अनिल कुलकर्णी, अस्मिता कुलकर्णी यांनी स्वागत केले. शुभदा हिरेमठ यांनी सूत्रसंचालन केले.
...

वंडरफूल थोरात

डॉ. जयसिंगराव पवार यांनी आपल्या मनोगतात उषा थोरात यांनी डॉ. थोरात यांच्याबद्दल लिहिलेल्या ‘वंडरफूल’ या शब्दाचा परामर्श घेत संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘डॉ. थोरात केवळ बुद्धिमान नव्हे तर शहाणे माणूस आहेत. ‘वंडरफूल’ या शब्दाचा मराठीत अर्थ पाहिला तर त्याच्या खूप छान, खूप मस्त, अद्भूत, भन्नाट अशा अनेक छटा दिसतात आणि त्या साऱ्या डॉ. थोरात यांच्या व्यक्तिमत्त्‍वामध्ये सामावलेल्या आहेत. असा माणूस हा कोल्हापूरचा अभिमान असून येत्या काळात त्यांनी आत्मचरित्राबरोबरच मराठा इतिहासाबाबत लेखन केले पाहिजे.’’