रेल्वे स्थानक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रेल्वे स्थानक
रेल्वे स्थानक

रेल्वे स्थानक

sakal_logo
By

रेल्वे अधिकाऱ्यांच्या निव्वळ
सूचनाच, प्रवाशांची गैरसोय कायम

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर ,ता. २६ ः येथील रेल्वे स्थानकावरील पायाभूत सुविधा सक्षम करण्याच्या सूचना विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदुराणी दुबे यांनी दिल्या आहेत. यापूर्वीही अशा सूचना अनेकवेळा दिल्या गेल्या, मात्र रेल्वेच्या प्रशासकीय पातळीवर मंजुरीचा घोळ, कंत्राटदारांकडून होणारे संथगतीने काम यामुळे रेल्वे प्रवाशांना गैरसोय सोसावी लागत आहे.
रेल्वे स्थानकावर अनेक वरिष्‍ठ अधिकारी भेट देतात, पाहाणी करतात. त्याच त्या सूचना देऊन निघून जातात. मात्र, प्रत्यक्ष काम होण्यास विलंब लागत आहे. अशात प्रवाशांच्या हिताच्या पायाभूत सुविधांची कामे पूर्ण करण्याविषयी प्रस्ताव पाठवा, आरखडा तयार करा, तातडीने मंजुरी देऊ, असे सांगून अनेक अधिकारी गुपचूप निघून गेले; मात्र येथील गैरसोयींची यादी जैसे थे आहे.
रेल्वे स्थानकाला प्रवेशव्दार करण्याचे नियोजन कोरोनापूर्वी झाले, मात्र प्रत्यक्ष कामाची निविदाही निघालेली नाही. मध्यवर्ती बस स्थानक ते राजारामपुरी मार्गावर उड्डाण पूल होणार, अशी गेली तीन वर्षांपासून फक्त चर्चाच आहे. उड्डाण पुलाचा आरखडा मंजुरी मिळण्यास एक वर्षाचा कालावधी लागला. प्रत्यक्ष काम सुरू होण्यास किती कालावधी लागेल, हे सांगता येत नाही.
रेल्वे स्थानकावर दोन स्वच्छतागृहे आहेत, मात्र त्यातील एक बंद असते, एक सुरू असते. अशी स्थिती गेली वर्षभर आहे. रेल्वे स्थानकावर चार तिकीट खिडक्या आहेत. येथे अनेकदा एक किंवा दोन खिडकीत तिकीट विक्री सुरू असते.
रेल्वे फाटकाशेजारी अतिक्रमण काढली जातात, पुन्हा काही दिवसांनी अतिक्रमण होतात. रेल्वे गोदाम परिसरात मातीचे ढिगारे, खड्डे अशा गैरसोयी कायम आहेत. पावसाळ्यात येथे मोठ्या प्रमाणात चिखल होतो.
...

प्रवासी मागणीच बेदखल

सह्याद्री एक्स्प्रेस सेवा कोरोनाकाळात बंद झाली आहे. त्यामुळे मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची कोंडी होत आहे. ही रेल्वे सुरू करा, अशी मागणी वर्षभरापासून होत आहे, मात्र ही गाडी किंवा पर्यायी गाडी सुरू करण्याचे आश्वासन बहुतेक वरिष्ठांनी दिले, पण प्रत्यक्षही गाडी सुरू झालेली नाही. यातून रेल्वेचे वरिष्ठ किती गांभीर्याने पाहणी करतात, सूचना किती करतात व अंमलबजावणी कशी होते, यातील तफावत दिसून येत आहे.