
कांदा शंभरला दहा किलो
85345
गडहिंग्लज : आठवडा बाजारात कलिंगडाला मागणी वाढली असून दरही तेजीत आहेत.
उन्हाचा तडाखा; लिंबू, कलिंगडाला मागणी
दर तेजीत; कांदा शंभरला दहा किलो, हिरवी मिरची, बिन्सचे दर टिकून
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २६ : मागणीपेक्षा अधिक आवक झाल्याने कांद्याचे दर गडगडले आहेत. शंभर रुपयेला दहा किलो अशी आरोळी देऊन विक्रेते दारोदारी विक्री करीत आहेत. उन्हाळ्यामुळे काकडी, लिंबू आणि फळबाजारात कलिंगडाला मागणी वाढली आहे. परिणामी, दर तेजीत आहेत. भाजी मंडईत हिरवी मिरची, बिन्स, कारली यांचे दर टिकून आहेत. जनावरांच्या बाजारात शेळ्या मेंढ्याचे दर वधारले आहेत.
गेल्या आठदिवसांपासून कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळेच दर घसरले आहेत. त्यातच स्थानिक बहिरेवाडी (ता. आजरा), तालुक्यातील हसूरचंपू, शेंद्री येथूनही आवक सुरू असल्याचे व्यापारी अमर नेवडे यांनी सांगितले. प्रतवारीनुसार किळकोळ बाजारात १० ते १५ रुपये असा दर आहे. अनेक विक्रेते तीन चाकी गाडीतून शंभरला दहा किलो, अशी आरोळी देत कांद्याची विक्री करीत आहेत. लसणाचा वधारलेला दर कायम आहे. नवीन आवक असून देशी ५० ते ७५ रुपये, तर उटी मोठ्या आकाराचा लसूण ६० ते १०० रुपये किलो आहे. बटाट्याचे दर उतरले आहेत. इंदूर १५ ते १८ रुपये, तर आग्रा २० ते २५ रुपये किलो आहेत.
भाजी मंडईत हिरवी मिरची, ढब्बू, बिन्स यांचे दर मागणीमुळे टिकून आहेत. पालेभाज्या ५ ते ७ रुपये पेंढी आहेत. कोंथिबिरीची पेंढी आकारानुसार ५ ते १० रुपये पेंढी असा दर होता. वांग्याची अधिक आवक झाल्याने दर उतरले आहेत. उन्हाळ्यामुळे काकडी, लिंबूची मागणी असून दरही वाढले आहेत. काकडी किरकोळ बाजारात ४० रुपये किलो आहे. लिंबू नगाला २ ते ३ रुपये दर आहे. दिवसेंदिवस आवक कमी होऊ लागल्याने लिंबूचे दर वाढण्याची शक्यता विक्रेत्यांनी व्यक्त केली. फळबाजारात सांगली जिल्ह्यातून येणाऱ्या द्राक्षांची आवक कायम आहे. द्राक्षे ४० ते ६० रुपये किलो आहेत. परदेशी सफरचंद १५० ते २०० रुपये किलो आहेत. कलिंगड १५ ते ५० रुपयापर्यंत दर होते. स्थानिक शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरमधून कलिंगडाची बाजारात विक्री केली. जनावरांच्या बाजारात म्हशींची १०० हून अधिक आवक नोंदली. पंचवीस ते नव्वद हजारांपर्यंत दर होते. यात्रामुळे शेळ्या मेंढ्यांना मागणीमुळे दर अधिक आहेत. पाच ते पंधरा हजारापर्यंत दर होते. सव्वाशेहून अधिक आवक झाल्याचे बाजार समितीतून सांगण्यात आले.
------------
चौकट..
रोपांचा बाजार घटला
ऊस तोडणी हंगाम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे लावणीत लावण्यासाठी फळभाज्या, कांदा रोपे यांची मागणी कमी झाली आहे. येथील गुणे पथवर हा रोपांचा बाजार भरतो. मागणी कमी झाल्याने हा बाजार घटला आहे. पंधरवड्याच्या तुलनेत निम्मेच विक्रेते आले होते. ब्याळकूड (ता. चिक्कोडी) येथून रोप विक्रते येतात. नोव्हेंबरपासून हा रोपांचा बाजार सुरू झाला होता.