
आदिनाथ चव्हाण उगार बातमी
85457
काटेकोर शेती पद्धतीचा अवलंब व्हावा
आदिनाथ चव्हाण; उगार खुर्दमध्ये ‘शिवार २३’ शेतकरी मेळावा
उगार खुर्द, ता. २६ ः वाढता खर्च आणि घटता नफा पाहता खर्चप्रधान शेती करायची की बचतप्रधान शेती करायची याचा निर्णय घेण्याची वेळ आता आली आहे. त्यासाठी सेंद्रिय आणि रासायनिक पद्धतीचा संयोग करून केलेली काटेकोर शेती पद्धती अवलंबणे गरजेचे बनले आहे, असे प्रतिपादन ‘सकाळ ॲग्रोवन’चे संपादक संचालक आदिनाथ चव्हाण यांनी शनिवारी (ता. २५) येथे केले.
उगार महिला मंडळाच्यावतीने येथे आयोजित केलेल्या ‘शिवार २३’ या शेतकरी मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी उगार महिला मंडळाच्या अध्यक्ष स्मिता शिरगावकर होत्या. उद्योगपती प्रफुल शिरगावकर, उगार महिला मंडळाच्या उपाध्यक्ष राधिका शिरगावकर, चित्राताई दळवी, गीताली शिरगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती. श्री. चव्हाण म्हणाले, ‘शेती व्यवसाय आतबट्ट्याचा ठरण्याची अनेक कारणे आहेत. रासायनिक शेती पद्धतीत सुरू असलेला वारेमाप खर्च निविष्ठा उत्पादक कंपन्यांना समृद्ध करतो आहे. त्यासाठी कर्ज काढून जोखीम स्वतःच्या डोक्यावर घेणारा शेतकरी कंगालच होतो आहे. या सापळ्यातून आता बाहेर पडावे लागेल. त्यासाठी काटेकोर शेती पद्धती अवलंबावी लागेल. शेती हा व्यवसाय आहे आणि ते शास्त्र आहे याचा विसर पडता कामा नये.’
स्मिता शिरगावकर, युवा दुग्ध व्यावसायिक श्रद्धा ढवण, सोलापूरच्या महिला शेतकरी उत्पादक कंपनीच्या अनिता माळगे, शेतीमाल निर्यातदार धनश्री शुक्ल यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी उत्तम शेती आणि प्रक्रिया उद्योग करणाऱ्या मीना खाडिलकर, सारिका जठार, वैशाली डोंगरे, उदय संकपाळ आणि प्रकाश घळसाशी यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन अनिता पुजारी यांनी केले.