कब्जेहक्क रक्कमेचा शासन आदेश रद्द करा ः धरणग्रस्तांची मागणी. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कब्जेहक्क रक्कमेचा शासन आदेश रद्द करा ः धरणग्रस्तांची मागणी.
कब्जेहक्क रक्कमेचा शासन आदेश रद्द करा ः धरणग्रस्तांची मागणी.

कब्जेहक्क रक्कमेचा शासन आदेश रद्द करा ः धरणग्रस्तांची मागणी.

sakal_logo
By

कब्जेहक्क रकमेचा शासन आदेश रद्द करा

श्रमिक मुक्ती दलाची मागणी; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन

कोल्हापूर, ता. २७ : धरणग्रस्तांच्या पर्यायी जमिनीच्या कब्जेहक्क रकमेची गणना करताना पात्र प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना मिळालेल्या रकमेवर १२ टक्के दराने व्याजाची आकारणी करण्याचा शासकीय आदेश काढण्यात आला आहे. हा निर्णय म्हणजे धरणग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असून हा अन्यायी शासकीय आदेश तातडीने मागे घ्यावा. यांसह अन्य मागण्यांसाठी धरणग्रस्तांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आणि येथे बेमुदत ठिय्या आंदोलन केले. आपल्या मागण्यांचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
श्रमिक मुक्ती दलाच्या निवेदनातील माहितीनुसार, शासनाने धरणग्रस्तांना मिळालेल्या पर्यायी जमिनीच्या संदर्भात १४ ऑक्टोबर २०२१ रोजी एक शासन आदेश काढला. यामध्ये पर्यायी जमिनीच्या कब्जेहक्काच्या रकमेची गणना करताना पात्र प्रकल्पबाधिता शेतकऱ्याने त्यास वाटप करावयाच्या पर्यायी जमिनीच्या संभाव्य कब्जेहक्काच्या रकमेपोटी त्याच्या संपादित जमिनीच्या मोबदल्याच्या रकमेतून ६५ ते ७० टक्के रक्कम शासनाकडे ठेव म्हणून ठेवायच्या रकमेवर पर्यायी जमिनीच्या वाटपाच्या दिनांकापर्यंत प्रती वर्षी १२ टक्के दराने व्याजाची आकारणी करण्यात येईल. ही रक्कम पर्यायी जमिनीच्या कब्जे हक्काच्या रकमेतून वजा करण्यात येईल. उर्वरित रक्कम संबंधित धरणग्रस्त शेतकऱ्याकडून वसूल करण्यात येईल. यासाठीची रक्कम धरणग्रस्त शेतकऱ्यांकडे नाही. त्यामुळे तातडीने हा शासन आदेश रद्द करावा. या बरोबरच अन्य मागण्याही निवेदनात केल्या आहेत.
दरम्यान, आज टाऊन हॉल बागेतून मोर्चाला सुरुवात झाली. जिल्ह्याच्या सर्व भागातून धरणग्रस्त येथे आले होते. मोर्चा सीपीआर चौक, दसरा चौक, व्हिनस कॉर्नर मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. येथे धरणग्रस्तांनी शासनाच्या विरोधात घोषणा दिल्या. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या मारला. जोपर्यंत शासकीय आदेश रद्द होत नाही; तसेच अन्य मागण्यांची पूर्तता होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा इशारा संघटनेने दिला आहे.
मोर्चाचे नेतृत्व श्रमिक मुक्ती दलाचे कार्याध्यक्ष संपत देसाई यांनी केले. त्यांच्यासोबत मारुती पाटील, डी. के. बोडके, वसंत पाटील, पांडुरंग कोठारी, शंकर पाटील, राजाराम परीट, शामराव कोठारी, शफिक सय्यद, अनिता पवार, सुमन बोडके यांच्यासह धरणग्रस्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.