संजय भोसले निलंबित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संजय भोसले निलंबित
संजय भोसले निलंबित

संजय भोसले निलंबित

sakal_logo
By

संजय भोसले अखेर निलंबित

घरफाळा विभागातील आर्थिक अनियमितताप्रकरणी कारवाई

कोल्हापूर, ता. २७ ः घरफाळा विभागातील आर्थिक अनियमितताप्रकरणी गुन्हा दाखल होऊन न्यायालयीन कोठडीत असलेल्या महापालिकेचा अंतर्गत लेखापरीक्षक संजय भोसले याला अखेर आज प्रशासकांनी निलंबित केले. तो महापालिका कर्मचारी संघाचा अध्यक्ष आहे. घरफाळा विभागातील उजेडात आलेल्या विविध प्रकरणांमध्ये आतापर्यंत पाच अधिकारी व कर्मचारी निलंबित झाले आहेत.
आर्थिक अनियमिततेप्रकरणी २२ फेब्रुवारीला रात्री भोसले याला अटक केली होती. दुसऱ्या दिवशी न्यायालयासमोर हजर केले असताना ६ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आल्याचा लक्ष्मीपुरी पोलिसांकडून अहवाल दिला होता. त्यानंतर भोसले याच्याकडून निलंबनाची कारवाई टाळण्यासाठी जामीन मिळवण्याचा प्रयत्न केला जात होता. पण न्यायालयाने जामीन फेटाळला. त्यामुळे ४८ तासांहून अधिक काळ पोलिस वा न्यायालयीन कोठडीत ठेवले असल्याने निलंबनाची कारवाई होणार हे स्पष्ट झाले होते. पण शनिवार व रविवारी कार्यालयीन सुटी असल्याने सोमवारी कारवाई केली जाणार होती. त्यानुसार आज सायंकाळी निलंबनाचे आदेश प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी काढले. त्या आदेशात गंभीर गैरवर्तनाबाबत भोसले याला सेवेतून तत्काळ निलंबित करण्यात येत असून उपायुक्तांकडे दैनंदिन स्वाक्षरी करावी, असे म्हटले आहे. तसेच या कारवाईची सेवापुस्तकात नोंद करण्यास सांगितले आहे.
गुन्हा दाखल झालेल्या प्रकरणातील १ कोटी ८० लाखाच्या अनियमिततेत त्याच्यावर ४६ लाख २३ हजार ३० रूपयांची जबाबदारी महापालिकेच्या अहवालात नमूद केली होती. भोसले याच्याबरोबर दोन अधीक्षक, एक लिपिक तसेच चार निवृत्त कर्मचाऱ्यांचीही नावे आहेत. त्यामुळे आता भोसले याच्यानंतर इतर दोषींवर कारवाई होण्याची शक्यता आहे. यापूर्वी चौघांना निलंबित करण्यात आले असून त्यातील एकाचे निधन झाले आहे. उद्या मुंबई उच्च न्यायालयात माजी उपमहापौर भूपाल शेटे यांनी दाखल केलेल्या फौजदारी रिट याचिकेची सुनावणी आहे. त्यात पोलिसांनी केलेली भोसले याला अटक तसेच मिळालेली न्यायालयीन कोठडीची माहिती दिली जाणार आहे. तसेच महापालिकेच्यावतीने केलेल्या निलंबनाची कारवाईही न्यायालयासमोर ठेवली जाणार आहे.
...

अटकपूर्व जामिनासाठी अर्ज

महापालिकेच्या घरफाळा गैरव्यवहारातील संशयित आरोपी संजय भोसले याने अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी आज पाचवे जिल्हा न्यायाधीश एच. ए. मुल्ला यांच्या न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. २ फेब्रुवारीला याबाबतची सुनावणी ठेवण्यात आली आहे. हा अटकपूर्व जामीन अर्ज भोसले याचे वकील प्रकाश मोरे यांनी दाखल केला आहे.