
देशाचे भवितव्य युवकांच्या हाती; ज्योतिरादित्य शिंदे
85707
आजरा : येथे मार्गदर्शन करताना केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे. या वेळी खासदार धनंजय महाडिक, समरजितसिंह घाटगे, भरमू पाटील, शिवाजीराव पाटील, अशोक चराटी, सुधीर कुंभार उपस्थित होते.
देशाचे भवितव्य युवकांच्या हाती
ज्योतिरादित्य शिंदे; आजऱ्यात नवयुवा मतदारांशी संवाद
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. २७ : जगात युवकांनीच परिवर्तन घडवली आहेत. हा इतिहास आहे. त्यामुळे आपल्या देशांचे भवितव्य युवक-युवतींच्या हाती आहे. तेच शक्तीशाली भारत घडवतील, असा विश्वास केंद्रीय विमान वाहतूक उड्डानमंत्री ज्योतीरादित्य शिंदे यांनी व्यक्त केला. आपल्या देशाची क्षमता पंतप्रधान नरेंद मोदी यांनी ओळखली आहे. त्यांचे विचार व कल्पनांना युवकांनी बळ द्यावे, असेही आवाहन त्यांनी केले.
येथील अण्णा भाऊ सांस्कृतिक सभागृहात झालेल्या मेळाव्यात त्यांनी नवयुवा मतदारांशी संवाद साधला. या वेळी खासदार धनंजय महाडिक, भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे, माजी राज्यमंत्री भरमू पाटील, शिवाजीराव पाटील, अण्णा भाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोक चराटी, भाजपचे तालुकाध्यक्ष सुधीर कुंभार या वेळी प्रमुख उपस्थित होते.
मंत्री शिंदे म्हणाले, ‘‘दहा वर्षांपूर्वी जगात भारताचीच अर्थव्यवस्था अकराव्या स्थानावर होती. ती आता पाचव्या स्थानावर गेली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नवीन विचार व संकल्पनावर देश प्रगतीची शिखरे गाठत आहेत. त्याला सर्वांनी साथ देण्याची गरज आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सहकार, पर्यटन, उद्योग वाढीला चांगला वाव आहे. त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया.’’
खासदार महाडिक म्हणाले, ‘‘मोदींमुळे देश बदलत आहे, राज्य बदलत आहे. त्यांची धोरणे व निर्णय यामुळे देश यशाची शिखरे गाठत आहे.’’ या वेळी आजरा सूतगिरणीच्या अध्यक्षा अन्नपूर्णादेवी चराटी, नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी, डॉ. दीपक सातोसकर, सुरेश डांग, विलास नाईक, रमेश कुरुणकर, विजयकुमार पाटील, अरुण देसाई यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक व युवती उपस्थित होत्या.
-------------
चौकट
कोल्हापूरच्या विमानतळासाठी २८० कोटी
कोल्हापूर येथील विमानतळासाठी २८० कोटी रुपये देणार आहे. या विमानतळाच्या वास्तुतून कोल्हापूरची ऐतिहासिक व सांस्कृतिक दर्शन पर्यटकांना घडेल. वर्षभरात या विमानतळाचे काम मार्गी लावले जाईल, असे मंत्री शिंदे यांनी सांगितले.
------------------
वीज, आरोग्य व इंटरनेटची कमतरता
केंद्रीय मंत्री शिंदे यांनी युवकांशी संवाद साधल्यावर त्यांनी शिक्षण घेताना येणाऱ्या अडचणी मांडल्या. वीज, आरोग्य व इंटरनेटच्या सुविधा व्यवस्थित मिळत नसल्याचे सांगितले. नगरसेविका शुभदा जोशी, लाकूडवाडीचे माजी सरपंच शंकर कुराडे यांनीही अडचणी मांडल्या.
--------------
प्रतापराव गुर्जर स्मारकाला भेट
नेसरी : सरसेनापती प्रतापराव गुर्जरांसह सात वीरांच्या इतिहास, स्मृती-संग्रामातून देश कार्य करण्याची ऊर्जा मिळते, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी केले. सरसेनापती प्रतापराव गुर्जर स्मारकाला त्यांनी भेट दिली. याप्रसंगी ते बोलत होते. या वेळी खासदार धनंजय महाडिक, शिवाजीराव पाटील, भरमूअण्णा पाटील, समरजित घाटगे, बाळासाहेब कुपेकर, भैयासाहेब कुपेकर उपस्थित होते. दरम्यान, नेसरीकर वाड्यात सरपंच गिरीजादेवी शिंदे-नेसरीकर यांनी स्वागत केले. यावेळी अजितसिंह शिंदे-नेसरीकर, संग्रामसिंह शिंदे-नेसरीकर, डॉ. राणोजी शिंदे-नेसरीकर, यशोधन शिंदे-नेसरीकर, संजयसिंह शिंदे-नेसरीकर, उपसरपंच प्रथमेश दळवी उपस्थित होते.