
भारतीय संस्कृती ‘रवळनाथ’ने जपली
86202
गडहिंग्लज : त्रिनेत्र महांत महास्वामीजी यांचा सत्कार एम. एल. चौगुले यांच्याहस्ते झाला. प्रा. व्ही. के. मायदेव, संचालक व अधिकारी उपस्थित होते.
भारतीय संस्कृती
‘रवळनाथ’ने जपली
शिवयोगी महास्वामीजी; गडहिंग्लजला संस्थेच्या प्रधान कार्यालयास भेट
गडहिंग्लज : सहिष्णुता, एकमेकांवर प्रेम करणे आणि सहकार्यातून पुढे जाणे हीच खरी भारतीय संस्कृती आहे. विश्वस्ताच्या भूमिकेसह सहकारातील आदर्श तत्त्वांबरोबर भारतीय संस्कृतीचा कृतिशील वसा रवळनाथने जपला, असे गौरवोद्गार श्रीरंगपट्टणम-मैसूरच्या चंद्रवन आश्रमाचे श्री त्रिनेत्र महांत शिवयोगी महास्वामीजी यांनी काढले.
श्री रवळनाथ को-ऑप. हौसिंग फायनान्स सोसायटीच्या प्रधान कार्यालय भेटीप्रसंगी ते बोलत होते. रवळनाथची पारदर्शक कार्यपध्दती आणि अल्पावधीतील प्रगती पाहून आनंद झाल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले. ते म्हणाले, योग्य नियोजन, वेळोवेळी मूल्यमापन व निर्धार या त्रिसूत्रीमुळेच श्री रवळनाथची भरभराट झाली आहे.’ चौगुले म्हणाले, ‘‘रवळनाथला मल्टी-स्टेट दर्जा मिळाल्यानंतर कर्नाटकातून पहिले सभासद होणारे निडसोशी मठाचे मठाधिपती श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजी होय. त्यांच्या आशिर्वादाने सुरु झालेला कर्नाटकातील शाखाविस्तार श्री. त्रिनेत्र महांत महास्वामीजी यांच्या आशीर्वादाने कर्नाटकभर होईल.
विद्या परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्यपदी निवडीबद्दल हलकर्णी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. डी. अजळकर यांचा स्वामीजींच्या हस्ते सत्कार झाला. प्राचार्य डॉ. अजळकर यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. उपाध्यक्ष प्रा. व्ही. के. मायदेव यांच्यासह संचालक, सीईओ डी. के. मायदेव, व्यवस्थापक शिवानंद घुगरे उपस्थित होते. आरती रिंगणे यांनी स्वागत केले. बोर्ड सेक्रेटरी सागर माने यांनी सूत्रसंचालन केले. संचालिका उमा तोरगल्ली यांनी आभार मानले.
------------
चौकट
संस्थापकांचा गौरव करणार
संस्थापक चौगुले यांनी लोकांच्या टीका-टिप्पणीकडे लक्ष न देता अहोरात्र घेतलेल्या कष्टातून व संघर्षातूनच संस्था मोठी झाली आहे. येत्या दसरा महोत्सवात त्यांचा मठातर्फे पुरस्काराने गौरव करणार असल्याचे महास्वामीजींनी जाहीर केले.