
दोन वर्षांनंतर आले मूळ स्वरुप
gad25.jpg
86338
गडहिंग्लज : जागृती हायस्कूलच्या केंद्रावर फलकावरील बैठक व्यवस्था पाहताना दहावीचे विद्यार्थी. (अमर डोमणे : सकाळ छायाचित्रसेवा)
दोन वर्षांनंतर आले मूळ स्वरुप
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २ : कोरोनाच्या संकटाने दोन वर्षांपूर्वी दहावीची परीक्षाच रद्द करण्याची वेळ आली होती. गतवर्षी परिस्थितीत थोडी सुधारणा झाली पण, संकट कायम होते. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी विद्यार्थ्यांची ज्या-त्या शाळेतच व्यवस्था केली होती. यंदा प्रथमच मूळ स्वरुपात दहावीची परीक्षा झाली. गडहिंग्लज तालुक्यात दहा केंद्रावर विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था होती. दोन हजार ७१६ विद्यार्थ्यांनी मराठीचा तर ४३ विद्यार्थ्यांनी ऊर्दूचा पेपर दिला.
यंदा कॉपीमुक्त अभियान हाती घेतले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची तपासणी करूनच केंद्रात सोडले. त्यासाठी प्रत्येक केंद्रावर खास झडती पथकांची नियुक्ती होती. केंद्रावर दाखल झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर परीक्षेचा तणाव दिसून येत होता. पाल्यांना सोडायला आलेल्या पालकांची केंद्राबाहेर गर्दी दिसून आली.
गडहिंग्लज तालुक्यात दहा केंद्रावर विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था होती. शहरात जागृती हायस्कूल, गडहिंग्लज हायस्कूल, साधना हायस्कूलवर तर ग्रामीण भागात बटकणंगले, हलकर्णी, महागाव, नूल, नेसरी, मुंगूरवाडी व कौलगे येथील माध्यमिक शाळेत केंद्र आहे. परिसरातील शाळांच्या विद्यार्थ्यांनी त्या-त्या केंद्रावर व्यवस्था होती. भरारी पथकांनी केंद्राना अचानक भेटी दिल्या.
-------------
पोलिसपाटील, कोतवालांची नियुक्ती
कॉपीमुक्त अभियान अंतर्गत प्रत्येक केंद्रावर बैठ्या पथकांची नियुक्ती केली आहे. बारावीच्या परीक्षेसाठी हे पथक कार्यरत आहे. या पथकात ग्रामसेवकांची नेमणूक केली आहे. आता दहावीच्या परीक्षेसाठी बैठ्या पथकात पोलिस पाटील व कोतवालांची नेमणूक केली आहे.