विक्रेता व एजंटस मोर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विक्रेता व एजंटस मोर्चा
विक्रेता व एजंटस मोर्चा

विक्रेता व एजंटस मोर्चा

sakal_logo
By

86486
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा स्वाभिमानी वृत्तपत्र विक्रेता व एजंटस् असोसिएशनतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेला मोर्चा. (मोहन मेस्त्री : सकाळ छायाचित्रसेवा)

मागतोय आमच्या हक्काचे...
वृत्तपत्र विक्रेत्यांचा मोर्चा; स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २ : वृत्तपत्र विक्रेता, एजंट, पायलटसह व्यवसायातील अन्य घटकांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन झालेच पाहिजे, या मागणीसाठी वृत्तपत्र विक्रेत्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाद्वारे आज धडक मारली. आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा, मागतोय आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे, वृत्तपत्र विक्रेत्यांचा विजय असो, या घोषणांनी कार्यालयाचा परिसर दणाणून सोडला. महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना प्रणित कोल्हापूर जिल्हा स्वाभिमानी वृत्तपत्र विक्रेता व एजंटस्‌ असोसिएशन, शहर स्थानिक व तालुका संघटनांतर्फे मोर्चाचे आयोजन केले होते. निवासी उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे यांना मागण्यांचे निवेदन दिले.
टाऊन हॉल बाग येथून मोर्चास सुरवात झाली. सीपीआर, दसरा चौक, कोंडा ओळ, व्हिनस कॉर्नर, असेंब्ली रोडमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रवेशद्वार असा मोर्चाचा मार्ग राहिला. प्रवेशद्वारावर जोरदार घोषणाबाजी झाली.
असोसिएशनचे राज्य सचिव रघुनाथ कांबळे म्हणाले, ‘‘आमचे आंदोलन लोकशाही मार्गाने सुरू आहे. हा लढा का सुरू केला आहे, हे शासनाने समजून घ्यावे. एखादा वृत्तपत्र विक्रेता आजारी पडला, तर त्याला सुटी घेऊन चालत नाही. बांधकाम कामगार, मोलकरीण, माथाडी कामगार, मत्स्य व्यावसायिकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन झाले असताना वृत्तपत्र व्यवसायातील घटकांसाठी झालेले नाही. त्याचाच जाब विचारण्यासाठी मोर्चाने धडक दिली आहे.’’
भरमा कांबळे म्हणाले, ‘‘वृत्तपत्र विक्रेत्यांची लढाई सुरू झाली आहे. बांधकाम कामगारांसाठी आम्ही लढाई सुरू केली होती. त्याचा परिणाम म्हणून त्यांच्यासाठी कल्याणकारी मंडळ स्थापन झाले. बत्तीस योजनांचा लाभ कामगारांना उठवता येत आहे. वृत्तपत्र विक्रेत्यांनी शासनाच्या विरोधात संघर्ष तीव्र करण्याची हीच वेळ आहे.’’
शिवाजी मगदूम म्हणाले, ‘‘विक्रेत्यांना त्यांच्या हक्काचे फायदे मिळाले पाहिजेत. शासनाने त्यांना वाऱ्यावर सोडून चालणार नाही. अन्यथा राज्यभरातील विक्रेते त्यांच्याविरोधात आवाज उठवल्याखेरीज स्वस्थ बसणार नाहीत.’’
दत्ता माने म्हणाले, ‘‘विक्रेत्यांचा संघर्ष दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे टोकाचा संघर्ष करावा लागेल. विक्रेते कल्याणकारी मंडळाच्या मागणीसाठी मैदानात उतरले असताना शासन १२२ उद्योगांचे एकच मंडळ करण्याच्या विचारात आहे. आम्हाला मात्र वृत्तपत्र व्यवसायातील कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ हवे आहे.’’
असोसिएशनचे राज्य सचिव विकास सूर्यवंशी, किरण व्हनगुत्ते, शिवगोंडा खोत, अण्णा गुंडे, सचिन चोपडे, गोरख भिलारे, अमर जाधव, सुरेश बह्मपुरे, सुरेश शिराळकर, राजारामपुरी डेपोचे अध्यक्ष आसिफ शेख, संघटक रमेश जाधव, उपाध्यक्ष महेश घोडके, संभाजीनगर डेपोचे अध्यक्ष राजाराम पाटील, परशुराम सावंत, कावळानाका डेपोचे अध्यक्ष कृष्णात शहापुरे, सुंदर मोरे, महानगरचे अध्यक्ष रवी लाड, सुरेंद्र चौगले, रणजित आयरेकर, शंकर चेचर, समीर कवठेकर, अंकुश परब, आसिफ मुल्लाणी यांचा मोर्चात समावेश होता.
-------------------
चौकट
...तर आमदारांच्या घरासमोर आंदोलन
आमदारांनी विधानसभेत स्वतंत्र कल्याणकारी मंडळावर आवाज उठवला नाहीतर त्यांच्या निवासस्थानांसमोर शंखध्वनी आंदोलन केले जाईल, असा इशारा रघुनाथ कांबळे यांनी दिला.