प्रवेशपत्रातील चुकांचा दहावीच्या विद्यार्थ्यांना फटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रवेशपत्रातील चुकांचा दहावीच्या विद्यार्थ्यांना फटका
प्रवेशपत्रातील चुकांचा दहावीच्या विद्यार्थ्यांना फटका

प्रवेशपत्रातील चुकांचा दहावीच्या विद्यार्थ्यांना फटका

sakal_logo
By

86379
86380
---
86489

प्रवेशपत्रातील चुकांचा विद्यार्थ्यांना फटका
‘दहावी’च्या पहिल्याच पेपरला धावपळ; योग्य माहिती मिळाली नसल्याने त्रास

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २ ः बारावी पाठपोठ दहावीच्या विद्यार्थ्यांनाही पहिल्याच पेपरला परीक्षा केंद्र शोधून त्याठिकाणी पोहोचण्यासाठी आज धावपळ करावी लागली. प्रवेशपत्रावर (ॲडमिशन कार्ड) बैठक व्यवस्था असलेल्या उपकेंद्राचा उल्लेख नसल्याचा फटका विद्यार्थ्यांना बसला. उपकेंद्राची माहिती योग्य आणि वेळेत मिळाली नसल्याने त्रास झाल्याचे सांगत पालक, विद्यार्थ्यांनी एसएससी बोर्डाच्या (माध्यमिक शिक्षण मंडळ) कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त केली.
प्रवेशपत्रावर उल्लेख असलेल्या केंद्रांवर काही विद्यार्थी सकाळी सव्वादहाच्या सुमारास आले. पण, त्यांना त्या केंद्राऐवजी उपकेंद्रावर बैठक व्यवस्था असल्याचे समजले. शहरातील भवानी मंडप, शाहूपुरी, राजारामपुरी आदी परिसरातील केंद्रांवर असा प्रकार घडला. पालकांसमवेत आलेले विद्यार्थी पावणेअकरापर्यंत उपकेंद्रावर पोहोचले. जे विद्यार्थी एकटे होते. त्यांनी धावपळ करत केंद्र गाठले. त्यातील अनेकजण पेपर सुरू झाल्यावर पोहोचले. उपकेंद्राचा उल्लेख प्रवेशपत्रावर नसल्याने अथवा त्याची माहिती शाळेतून योग्य वेळेत मिळाली नसल्याने त्यांना फटका बसला.
दरम्यान, गुरुवारी सकाळी पावणेदहा वाजल्यापासून परीक्षार्थी विद्यार्थी, विद्यार्थिनी येऊ लागल्या. त्यातील अनेकांसमवेत पालक होते. केंद्र अथवा कक्षात प्रवेश करण्यापूर्वी बहुतांश विद्यार्थ्यांनी नोटस, पुस्तकांवर उजळणीची शेवटची नजर टाकली. प्रवेशपत्र, ओळखपत्र पाहून आणि इतर साहित्याची तपासणी करून त्यांना परीक्षा कक्षात प्रवेश दिला. काही केंद्रावरील परीक्षार्थींनी ‘मी कॉपी करणार नाही’ अशी प्रतिज्ञा केली. सकाळी ११ ते दुपारी २ वाजून १० मिनिटे यावेळेत मराठी विषयाचा पेपर झाला. पेपर सुटेपर्यंत पालक केंद्रांवर थांबून होते. परीक्षा मुलांची आणि चिंता पालकांना असे चित्र या केंद्रांवर दिसले.

चौकट
पेपरची तारीख, विद्यार्थ्यांच्या नावात चूक
बोर्डाची चुकांची मालिका काही थांबलेली नाही. दहावीच्या विद्यार्थ्यांना दिलेल्या काही प्रवेशपत्रांत संबंधित विद्यार्थ्याचे नाव, आडनाव, पेपरची तारीख, उपकेंद्राचा उल्लेख नसणे अशा चुका झाल्या आहेत. प्रत्यक्षात हिंदी विषयाचा पेपर ६ मार्चला असताना त्याची नोंद प्रवेशपत्रात ८ मार्च अशी झाली आहे. या चुकांमुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.

चौकट
‘सकाळ’ला धन्यवाद
दहावीच्या परीक्षेसाठी माझ्या मुलाच्या प्रवेशपत्रावर म. ल. ग. हायस्कूल केंद्राचे नाव होते. मात्र, प्रत्यक्षात त्याची बैठक व्यवस्था प्रिन्सेस इंदुमतीदेवी गर्ल्स हायस्कूल या उपकेंद्रावर होती. या केंद्रावरील बैठक व्यवस्था ‘सकाळ’ने योग्य स्वरूपात प्रसिद्ध केली. त्यामुळे योग्य केंद्राची माहिती मिळाल्याने माझ्यासह अन्य काही पालकांच्या मुलांची धावपळ वाचली. त्याबद्दल ‘सकाळ’चे धन्यवाद मानतो, अशी प्रतिक्रिया पाचगाव येथील गिरीश आरेकर यांनी व्यक्त केली.

विद्यार्थी काय म्हणाले?
कोट
प्रवेशपत्रावर नोंद असलेल्या परीक्षा केंद्रावर सकाळी सव्वादहा वाजता मी आणि माझा मित्र आलो. त्यावेळी अचानकपणे आमची बैठक व्यवस्था दुसऱ्या एका उपकेंद्रावर असल्याचे सांगण्यात आले. याठिकाणी पोहोचण्यासाठी आमची धावपळ झाली.
-निखिल कांबळे, दौलतनगर

कोट
मला उपकेंद्रावरील बैठक व्यवस्थेची ऐनवेळी माहिती मिळाली. त्याचा त्रास झाला. पेपर सोपा गेला. मला मिळालेल्या प्रवेशपत्रात माझे आडनाव आणि हिंदी विषयाच्या पेपरच्या तारीख चुकीची नोंद झाली आहे.
-मोहीत खानविलकर, राजारामपुरी १४ वी गल्ली

चौकट
पहिल्या पेपरला १ लाख १२ हजार परीक्षार्थी
कोल्हापूर विभागात दहावीतील मराठीच्या पेपरला एकही गैरप्रकार घडला नाही. एकूण १,१२,३४१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, तर ९२५ जण गैरहजर राहिले. उपकेंद्राची माहिती मिळाली नसल्याने ज्या विद्यार्थ्यांना केंद्रावर पोहोचण्यास विलंब झाला. त्यांना वेळ वाढवून देण्यात आला, असे शिक्षण मंडळाचे विभागीय सचिव डी. एस. पोवार यांनी सांगितले.

चौकट
कसबा बावड्यातील केंद्रात बदल
कसबा बावडा येथील राजाराम हायस्कूलमध्ये अचानकपणे बांधकाम सुरू झाले आहे. त्यामुळे या परीक्षा केंद्रांतील सर्व विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था श्री दत्ताबाळ प्राथमिक विद्यामंदिर (एस. पी. ऑफिससमोर) याठिकाणी केली आहे.