तालुका विभाजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तालुका विभाजन
तालुका विभाजन

तालुका विभाजन

sakal_logo
By

86525

करवीर तालुक्याचे विभाजन होणार?
राज्य शासनाकडून समिती नियुक्त; लोकसंख्या, जमीन, तालुक्याच्या क्षेत्राचा विचार

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता.२ ः लोकसंख्या, क्षेत्र, जमीन महसूल यावर आधारित राज्यातील मोठ्या तालुक्यांचे विभाजन करण्यात येणार आहे. याचा अभ्यास करण्यासाठी शासनाने कोकण विभाग आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. शासनाने समितीला सहा महिन्यांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील करवीर तालुक्याचे मोठे कार्यक्षेत्र पाहता करवीर शहर व ग्रामीण असे विभाजन होण्याची शक्यता आहे. सध्या करवीरमध्ये शहरासह सुमारे ११८ गावांचा समावेश आहे. काही गावे मुख्यालयापासून ३० ते ४० किलोमीटरवर आहेत. त्यामुळेच नव्या समितीचा करवीरच्या विभाजनाला ग्रीन सिग्नल मिळण्याची शक्यता आहे.
राज्यातील बहुंताश तालुक्यांच्या लोकसंख्येत मोठी वाढ झाली आहे. अशा तालुक्यांच्या विभाजनाचा प्रस्ताव शासनाकडे गेला आहे. कपूर समितीने १९७५ मध्ये तलाठी, सज्जासाठी निश्‍चित केलेल्या शंभर गुणांच्या सूत्रानुसार समितीने ठरवलेल्या निकषानुसार प्रादेशिक रचना करता येते; तथापि हे निकष सादर करून बराच कालावधी उलटून गेला आहे. त्यात संगणकीकरण, माहिती तंत्रज्ञानात झालेले बदल, काही तालुक्यात अलीकडे स्थापन झालेली प्रस्तावित अपर तहसील कार्यालये, नवे तलाठी, सज्जा, मंडल कार्यालये स्थापन करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. त्यातून इचलकरंजीत अपर तहसील कार्यालय मंजूर झाले आहे.
या सर्व बाबींचा विचार करून तालुक्यांचे विभाजन करणे आवश्‍यक असल्याने या समितीची स्थापना झाली आहे. समितीने नव्या तालुक्यात समाविष्ट करावयाची गावे, लोकसंख्या, खातेदार, जमीन महसूल, तालुक्यांतर्गत येणारे क्षेत्र, नव्या तालुक्यासाठी मुख्यालयात असलेल्या सुविधा, मुख्यालयाचे भौगोलिक नैसर्गिक, ऐतिहासिक स्वरूप, जनतेचा कौल, नव्या तालुक्यातील तंत्रज्ञानाच्या सुविधांची उपलब्धता आदींचा अभ्यास करून अहवाल सादर करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत.
नव्या तालुक्याच्या निर्मितीसाठी अंदाजे किती खर्च येईल, त्याचा वार्षिक खर्च किती असेल, तालुका विभाजनाची होत असलेली मागणी, त्याची प्रशासकीय निकड याचाही विचार अहवाल पाठवताना करावा, असेही या आदेशात म्हटले आहे.

इचलकरंजीत यापूर्वीच अपर तहसील कार्यालय
पूर्वी हातकणंगले तालुक्यात इचलकरंजी शहराचा समावेश होता. इचलकरंजी शहराची लोकसंख्या, खातेदार पाहता याचा मोठा ताण हातकणंगले तहसीलवर होता. दोन वर्षांपूर्वी इचलकरंजीसाठी स्वतंत्र अपर तहसीलदार पद तयार करण्यात आले. त्यामुळे शहराचा तालुक्यावर पडणारा ताण कमी झाला आहे.

अशी आहे समिती
अध्यक्ष- विभागीय आयुक्त, कोकण
सदस्य सचिव- उपआयुक्त (महसूल) कोकण
सदस्य- विभागीय आयुक्त पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर.