
बोर्डाच्या परीक्षेने महापालिका शिक्षकांची ‘कसरत’
दहावी, बारावीच्या परीक्षेने
महापालिका शिक्षकांची ‘कसरत’
कोल्हापूर, ता. ५ ः आंतरशालेय क्रीडा स्पर्धेचे नियोजन करण्यासह शासनाच्या यू-डायस प्रणालीत विद्यार्थ्यांच्या माहिती भरण्याचे काम त्वरित पूर्ण करण्यासाठी महापालिका शाळेतील शिक्षकांची धावपळ सुरू आहे. त्यातच राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (बोर्ड) दहावी, बारावीच्या परीक्षा कामकाजासाठी रोज त्यांच्यापैकी किमान ३५ जणांना घेतले जात असल्याने या शिक्षकांना कसरत करावी लागत आहे.
महानगरपालिकेच्या ५८ शाळांमध्ये २६० शिक्षक कार्यरत आहेत, तर ४० पदे रिक्त आहेत. सध्या आंतरशालेय क्रीडा स्पर्धा असल्याने त्यासाठी विद्यार्थ्यांना मैदानावर काही शिक्षक घेऊन जातात. या स्पर्धांसाठी पंच आणि व्यवस्थापक म्हणून ५० शिक्षक काम करत आहेत. यू-डायसवर सांख्यिकी माहिती भरण्याचे काम काही शिक्षक करत आहेत. त्यातच दहावी, बारावीच्या परीक्षेसाठी पर्यवेक्षक, बैठे पथकासाठी रोज ३५ शिक्षकांच्या ऑर्डर काढण्यात येत आहेत. त्यामुळे वर्गात अध्यापनाचे काम करणाऱ्या शिक्षकांची संख्या प्रत्येक शाळेत कमी झाली आहे. त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. दरम्यान, याबाबत नगरपालिका महानगरपालिका शिक्षक समितीचे राज्यप्रमुख सुधाकर सावंत यांनी सांगितले की, ‘सध्याची स्थिती आणि विद्यार्थी लक्षात घेता राज्य शासनाने दहावी, बारावीच्या परीक्षांच्या कामासाठी महानगरपालिका शिक्षकांच्या नेमणुका करू नयेत.’