
डॉक्सी फॉलोअप
‘डॉक्सी’ची भारतात नोंद नसल्याने
पैसे मिळण्याबाबत संभ्रमावस्था
कोल्हापूर, ता. २ ः डॉक्सी कंपनीत नेमके कोणाकडे पैसे गुंतवले याची माहिती काही गुंतवणूकदारांना नाही. काहींना मोबाईल क्रमांकही माहिती नाहीत. विशेष म्हणजे ही कंपनीच भारतात नोंद नाही, त्यामुळे गुंतवणूकदारांचे पैसे मिळणार कसे, संशयितांना कोठून शोधायचे असाही प्रश्न उपस्थित राहत आहे.
एकच सेमिनार तारांकित हॉटेलमध्ये झाला. त्यानंतर ऑनलाईन बैठका झाल्या आणि आभासी चलनाच्या माध्यमातून गुंतवणूक झाली. आपण कोठे गुतंवणूक करतोय, कोणाकडे करतो, याची कोणतीही कल्पना काही गुंतवणूकदारांनाही नसल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे जी कंपनी परदेशात नोंदणीकृत आहे ती भारतात नाही. त्यामुळे त्याचे मूळ कोठे आहे. ज्यांना पैसे दिले, ज्या ठिकाणी गुंतवणूक केली त्यांनी त्या गुंतवणुकीचे पुढे काय केले? याबाबत संभ्रमावस्था आहे. त्यामुळे तपासात अडथळे येत आहेत. सुरुवातीचे काही महिने गुंतवणूकदारांना त्यांचे खाते ऑनलाइन सुरू होते. कॉइनच्या किमतीतील वाढ, त्यानुसार गुंतवलेल्या रकमेवरील फायदा, याचे तपशील पाहायला मिळत होते. मात्र, हे सर्व काही आभासी होते. प्रत्यक्षात कंपनीचे कामकाज थांबल्यानंतर गुंतवणूकदारांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यावेळी त्यांची खातीही बंद झालेली होती.