
संजय राऊत
मुख्यमंत्र्यांची शिवधनुष्य
यात्रा म्हणजे पैशांचा खेळ
संजय राऊत : महाराष्ट्रात ढोंग नव्हे सचोटी चालते
कोल्हापूर, ता. ३ : ‘रावणानेही शिवधनुष्य उचलले होते, त्याचे काय झाले हे रामायणातून समजून घ्या. मुख्यमंत्र्यांची यात्रा म्हणजे सारा पैशांचा खेळ आहे,’ असा टोला खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवधनुष्य यात्रेला लगावला. त्याचवेळी त्यांनी ‘महाराष्ट्रात ढोंगं-सोंगं नव्हे तर सचोटी, प्रामाणिकपणा चालतो. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना वारंवार अशा अग्निपरीक्षेतून बाहेर पडली आहे,’ असेही सुनावले.
कोल्हापूरचा दौरा आटोपून पुढील दौऱ्यावर जाताना खासदार राऊत पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, ‘‘निवडणूक आयोग राजकीय हस्तक बनून सत्ताधाऱ्यांचे काम करत होता, त्याला आळा घालण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाला पुढे यावे लागले. लोकशाहीवरील संकट त्यांनी थांबवले. विधिमंडळ, आमदारांचा अपमान होईल, असे कोणतेही विधान मी केलेले नाही. मुख्यमंत्र्यांनीही विरोधी पक्षांना देशद्रोही म्हटले आहे. नंतर सारवासारव केली. जो विशिष्ट गट बेकायदेशीरपणे शिवसेना आमची असल्याचे सांगत आहे, त्यांना मी चोरमंडळ म्हटले आहे. हे विधान बाहेर केले आहे, त्यामुळे हक्कभंग होतो की नाही हे पहावे लागेल. हक्कभंगाच्या नोटीसला उत्तर दिले नाही तर फासावर लटकवणार आहेत का? तुरुंगात टाकून झाले, आता फासावर लटकवणार असतील तर लकटवावे. निवडणुकांपुरते गृहमंत्री जातात व तिथे कायदा हातात घेऊन आपल्या पक्षासाठी राबवतात. निवडणूक आयोगाप्रमाणे पोलिस यंत्रणाही वागत असेल तर सर्वोच्च न्यायालयात जावे लागेल.’’
...
कालपासून घाम फुटला आहे
खासदार राऊत म्हणाले, ‘‘कसब्यातील निकालामुळे कालपासून त्यांना घाम फुटला आहे. जी थोडीफार झोप शिल्लक होती तीसुद्धा उडाली आहे. चिंचवडला भाजपचा विजय झाला आहे, असे आम्ही मानत नाही. आमच्यातील बंडखोर उभा करून मतविभागणीत यश मिळाल्यामुळे त्यांना विजय मिळाला. अन्यथा चिंचवडसुद्धा कसब्याच्याच मार्गाने गेला असता. या निकालांमुळे राज्यातील अनेक निवडणुका आणखी पुढे जाणार आहेत.’’