
गडहिंग्लज नगरपरिषदेच्या अंदाजपत्रकास मंजुरी
गडहिंग्लज नगरपरिषदेच्या अंदाजपत्रकास मंजुरी
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ३ : येथील नगरपरिषदेचा महसूली व भांडवली ५१ लाखाचा शिलकी अंदाजपत्रक मंजूर केला आहे. अंतिम मंजूरीसाठी हा अंदाजपत्रक जिल्हाधिकाऱ्यांना सादर केल्याची माहिती प्रशासक तथा मुख्याधिकारी स्वरुप खारगे व लेखापाल प्रविण पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
एकूण ५३ कोटींच्या अर्थसंकल्पात नाट्यगृह, नवीन अग्निशमन वाहन, त्याचे साहित्य, पाणी योजना, सौर प्रकल्प, शिक्षण, कला, क्रीडा, महिला बालकल्याण, रस्ते, गटारी, दिव्यांग कल्याण निधी, प्रसाधनगृहे, पथदिवे, इमारती दुरुस्ती आदीसाठी विशेष तरतुदी अर्थसंकल्पात केल्याचेही ते म्हणाले. पालिकेच्या तिजोरीत १९ कोटी ११ लाख ४१ हजार महसूल जमा होणार असून त्यातील १९ कोटी ६ लाख ६६ हजार रुपये खर्च होणार आहेत. ४ लाख ७५ हजार शिल्लक राहणार आहेत. ३४ कोटी ५७ लाख ४९ हजार भांडवली जमा होणार असून त्यातून विविध योजना, पायाभूत सुविधा, नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी ३४ कोटी १० लाख ५३ हजाराची तरतूद केली आहे. निवडणुकीसाठी ५५ लाखाची तरतूद केल्याचेही त्यांनी सांगितले. राखीव निधीसाठीही ५७ लाखाची तरतूद केली आहे.