
आमदार हसन मुश्रीफ
निराधारांना दरमहा दोन हजार पेन्शन द्यावी
आमदार हसन मुश्रीफ : अर्थसंकल्पीय अधिवेशनात मागणी
कोल्हापूर, ता. ३ ः निराधार पेन्शन योजनेतील विधवा, परित्यक्त्या आणि ६५ वर्षांवरील वृद्धांची पेन्शन दरमहा दोन हजार रुपये करा, अशी आग्रही मागणी आमदार हसन मुश्रीफ यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये केली. आमदार ऋतुराज पाटील यांनी मांडलेल्या लक्षवेधीमध्ये उपप्रश्न विचारून आमदार श्री. मुश्रीफ यांनी ही मागणी केली.
निराधारांना दर महिन्याची एक हजार, बाराशे रुपये पेन्शन मिळण्यासाठी बँकेसमोर रांगा लावून बसावे लागते. लाभार्थ्यांना बीडीएस सिस्टीमद्वारे ऊणे पद्धतीने दर महिन्याला नियमित पेन्शन मिळावी. केंद्र सरकारप्रमाणेच ज्येष्ठ नागरिकांचे वय साठ वर्षे करावे, अशी मागणीही त्यांनी केली. त्याला उत्तर देताना विशेष साहाय्यमंत्री संजय राठोड म्हणाले, ‘३१ मार्चपर्यंतचे अनुदान देण्यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पैसे वितरित केले आहेत. पेन्शनधारक लाभार्थ्याच्या पात्रतेसाठी उत्पन्न मर्यादा ५० हजार रुपयांपर्यंत करण्यासाठी विभाग सकारात्मक आहे. पेन्शनधारक लाभार्थ्यांची मुले २५ वर्षांची झाल्यानंतर पेन्शन बंद होते. २५ वर्षे वय झालेल्या मुलांच्या बाबतीत नोकरी किंवा आर्थिक स्त्रोत पाहून निर्णय मंत्रिमंडळ घेईल. ज्येष्ठ नागरिकत्वाची वयोमर्यादा साठ करण्याबाबतही विचार केला जाईल.’ दरम्यान, जानेवारी २०२३ मध्ये एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेवेळी झालेल्या फसवणुकीबाबतही आमदार श्री. मुश्रीफ यांनी उपस्थित केला. फसवणूक करणाऱ्यांविरोधात गुन्हा नोंद झाला असून, काहींना अटक केली आहे. आणखी काहींचा शोध पोलिस घेत असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.