सीपीआर मधून कैदी पळाला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सीपीआर मधून कैदी पळाला
सीपीआर मधून कैदी पळाला

सीपीआर मधून कैदी पळाला

sakal_logo
By

86975
86979
...आरोपी पकडल्यानंतरचा सीपीआर मधील फोटो आहे.
------

पळालेल्या कैदी साडेसात तासांनी जेरबंद

कैदी सांगलीचाः उसाच्या शेतातून बाहेर आला अन सापडला

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. ४ ः छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात उपचारासाठी आणलेल्या कैद्याने क्षयरोग कक्षातून पोलिसांला धक्का देवून बेडीसह पळ काढला होता. त्याला पोलिसांनी साडेसात तासांनी अटक केली. निवास अरविंद होनमाने (वय ३५, रा. येळावी, तासगाव, जि. सांगली) असे त्याचे नाव आहे. याची फिर्यादी सहाय्यक फौजदार संजय महादेव घोंगडे यांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात दिली आहे.
रात्री आठच्या सुमारास होनमानेला रमण मळ्यातील पोस्ट आॅफिस चौकात पकडण्यात आले. यापूर्वी तो मिरजेतील रुग्णालयातूनही पळून गेला होता. तेंव्हा तो वीस दिवस उसाच्या शेतात बसून होता. त्यामुळेच पोलिसांनी उसाच्या शेतात, बंद घरे, वाहने येथे शोध सुरू ठेवला होता. सीसीटीव्ही पाहिले होते. दरम्यान, सायंकाळी अंधार पडल्यानंतर तो उसाच्या शेतातून रस्त्यावर आल्यानंतर पोलिसांनी त्याला पकडले.
पोलिसांकडून आणि सीपीआरमधून मिळालेली माहिती अशी, येथील कळंबा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांना अधिक उपचारासाठी सीपीआरमध्ये आणले जाते. यासाठी एका कैद्यासोबत दोन तर दोन कैद्यासोबत तिघे पोलिस असतात. यामध्ये एक बंदूकधारी पोलिस असतो. अशाच बंदोबस्तात आज सकाळी काही कैद्यांना वैद्यकीय उपचारासाठी सीपीआरमध्ये आणले होते. त्यातील होनमाने या कैद्याला क्षयरोगाचा त्रास सुरू असल्यामुळे त्याला त्या कक्षात दाखल केले. यावेळी त्याच्या हाताला बेड्या होत्या. तो साध्या वेशात उपचारासाठी क्षयरोग कक्षात गेला. उपचारानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कैद्याच्या कागदपत्रांची तपासणी केली. त्यानंतर पोलिस कागदपत्रे घेण्यासाठी डॉक्टरांच्या कक्षात जाताना त्यांना धक्का देवून तो पळून गेल्याची नोंद पोलिस डायरीला झाली आहे. तेथील महिला कर्मचाऱ्याला लक्षात येताच त्यांनी कैदी पळालाऽऽ पळालाऽऽऽ असा ओरडा केला. त्यामुळे पोलिसांसह सीपीआरमधील काही कर्मचारी त्याच्या मागे धावले. पण त्यांना कैदी नेमका कोठे गेला हे समजून आले नाही.

पोलिसांनी सीपीआरचा परिसर पिंजून काढला. सीपीआर चौकातून पुढे स्मशानभूमीकडे जाताना शेतवड आहे. तर दसरा चौकातून पुढे स्टेशन रोडमार्गे मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वेस्थानक आहे. तसेच आज जुनी पेन्शन मिळण्यासाठी महामोर्चा होता. कसबा बावड्यामार्गे महार्गावरही कैदी पळू शकतो या सर्व शक्यता गृहीत धरून, पोलिसांनी यंत्रणा सतर्क ठेवली होती. सीसीटीव्हीचा आधार घेतला जात होता. यापूर्वीही तो मिरजेतून पळून गेल्यानंतर उसाच्या शेतात वीस दिवस बसला होता. त्याचाही संदर्भ घेवून पोलिसांकडून शेतातही त्याचा शोध सुरू होता.

तो बाहेर आला म्हणून सापडला...

होनमाने हा पळून गेल्यानंतर त्याच्या हातात बेडी तशीच होती. त्याच्या अंगावर काळ्या रंगाची पँट आणि पांढऱ्या रंगाचा शर्ट होता. अनवाणी असतानाही भिंतीवरून उडी मारल्यानंतर हातातील बेडी लपवत तो दसरा चौकातून शहाजी कॉलेजच्या दिशेने गेला. याचे सीसीटीव्हीही फुटेज पोलिसांकडे उपलब्ध झाले. त्यानंतर विन्स हॉस्पटलकडे जाणाऱ्या नागाळा पार्क रस्त्याकडून तो शेतवडीत पोचला. दिवसभर ऊन होते आणि पोलिसांकडून शोध सुरू असल्यामुळे तो तेथे उसाच्या शेतात लपून बसला. सायंकाळी अंधार पडल्यानंतर तो रमण मळ्यातून पोस्ट ऑफिस चौकाच्या दिशेने जात असताना पोलिसांनी त्याला अटक केली. त्याला फिट आल्यामुळे सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी ही कामगिरी केल्याचीही माहिती पोलिसांनी दिली.
----------

सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद

लक्ष्मीपुरी, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांनी सीपीआरमधील सर्व इमारतींमध्ये कैद्याचा शोध सुरू केला. यानंतर सीपीआरच्या आजूबाजूचे सीसीटीव्ही तपासणीही सुरू केली. यावेळी दसरा चौकातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो कैदी भिंतीवरून उडी टाकून पळाल्याचे स्पष्ट झाले.