
शिवजयंतीनिमित्त व्याख्यान
‘सर्वाधिक किल्ले बांधणारा
एकमेव राजा म्हणजे शिवराय’
कोल्हापूर, ता. ५ : ‘नव्या पिढीला छत्रपती शिवरायांचे कार्य आणि विचारांची ओळख करून देताना सबळ ऐतिहासिक दाखले देऊन सत्यता सांगणे गरजेचे आहे. राजमाता जिजाऊ याच शिवरायांच्या गुरू आहेत. आपल्या नियोजनपूर्ण पराक्रमाने आणि मावळ्यांच्या साथीने महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक किल्ले बांधण्याचे कार्य करणारा जगातील एकमेव राजा म्हणजे शिवराय होय’, असे प्रतिपादन रायगड विकास प्राधिकरण समितीचे सदस्य राम यादव यांनी केले.
वाठार तर्फ वडगाव येथील श्री. बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्समध्ये सर्व विभाग आणि सोशल क्लबतर्फे ‘शिवचरित्र समजून घेताना...’ यावर व्याख्यान झाले. संचालक डॉ. एच. टी. जाधव अध्यक्षस्थानी होते.
श्री. यादव यांनी शिवरायांची युद्धनीती, व्यापारनीती, व्यवस्थापननीती, राज्यकारभाराची पद्धत, कल्पकता, उद्यमशीलता, गोरगरीब, शेतकरी व स्त्रियांबद्दलचा आदर यावर मार्गदर्शन केले. तसेच राजर्षी शाहू महाराजांनी केलेल्या शिवचरित्र संबंधित कार्यासंबंधी ही माहिती दिली. शिवरायांची समकालीन दुर्मिळ चित्रे, शिवरायांच्या वापरातील वस्तूही दाखवल्या.
कदीर मुजावर याने शिवगर्जना देऊन मानवंदना केली. स्टुडंट वेल्फेअर डीन प्रा. जे. एम. शिंदे यांनी स्वागत केले. सोशल क्लबचे प्रमुख प्रा. दिग्विजय पवार यांनी आभार मानले. गौतमी शिरगावकर हिने सूत्रसंचालन केले.