
होळी
87536, 87576
स्मशानभूमीला लाखांवर शेणी दान
पारंपरिक उत्साहात होळीचा सण, गरजूंना पोळ्यांचे वितरण
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ७ ः होळीच्या निमित्ताने सामाजिक भान जपत यंदाही कोल्हापूरकरांनी पर्यावरणपूरक उपक्रमांवर भर दिला. प्रतीकात्मक होळी साजरी करून लाखावर शेणी पंचगंगा स्मशानभूमीकडे सुपूर्द केल्या. पंधराहून अधिक टन लाकूडही स्मशानभूमीकडे दिले. दरम्यान, टिमक्यांच्या आवाज आणि शंखध्वनीचा पारंपरिक थाट कायम ठेवत काल सर्वत्र होळ्या प्रज्वलित केल्या.
दरम्यान, करवीर निवासिनी श्री अंबाबाईची आज विशेष सालंकृत पूजा बांधण्यात आली. श्री महालक्ष्मी भक्त मंडळातर्फे आज रात्री घाटी दरवाजा येथे होळी प्रज्वलित झाली. मंडळाचे अध्यक्ष राजू मेवेकरी, एस. के. कुलकर्णी, नंदकुमार मराठे उपस्थित होते.
गरजूंना पुरणपोळी
होळीच्या निमित्ताने पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण केला जातो. मात्र, नैवेद्यानंतर या पोळ्या गरजूंना देण्यासाठी विविध संस्था, संघटनांनी राबवलेल्या पोळीदान उपक्रमालाही मोठा प्रतिसाद मिळाला. वीटभट्टी कामगार, ऊसतोड कामगारांसह विविध ठिकाणच्या अनाथ-निराधारांना पोळ्या वितरित केल्या. ग्रामीण भागातही यंदा मोठा प्रतिसाद मिळाला.
प्रिन्स क्लबतर्फे अंतराळी होळी
खासबाग येथील प्रिन्स क्लबने यंदाही पर्यावरणपूरक अंतराळी होळी साजरी केली. शहरात रस्त्यांची दुरवस्था आहे. रस्ते पॅचवर्क करायला महापालिकेकडे निधी नाही. या पार्श्वभूमीवर यंदाही ही परंपरा क्लबने जपली. संदीप पोवार, संजय राऊत, अभिजित पोवार, एस. एन. जोशी, रामचंद्र जगताप, अशोक पोवार, जयदेव बोरपाळकर, प्रदीप काटकर, रामभाऊ कोळेकर उपस्थित होते.
आता वेध रंगपंचमीचे...
होळीच्या सणातील सहकुटुंब आनंदोत्सवाची पर्वणी ठरणारी रंगपंचमी रविवारी (ता.१२) साजरी होणार असून, विविध प्रकारचे रंग आणि पिचकाऱ्यांनी बाजारपेठ सजली आहे. नैसर्गिक व वनस्पतीजन्य रंगांनाही यंदा मोठी मागणी आहे.