
गडहिंग्लजला जनता दलाचा मोर्चा
87648
गडहिंग्लज : गॅस, वीज दरवाढीविरोधात जनता दलाने प्रांत कार्यालयावर काढलेला मोर्चा. (छायाचित्र : मज्जिद किल्लेदार, गडहिंग्लज)
गडहिंग्लजला जनता दलाचा मोर्चा
प्रांत कार्यालयावर आंदोलन; गॅस, वीज दरवाढीवरून शासनाचा निषेध
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ८ : जनता दलाने आज येथील प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला. या माध्यमातून गॅस दर वाढला, तर विजेच्या प्रस्तावित दरवाढीला विरोध केला. या वेळी शासनाचा जोरदार निषेध करण्यात आला. माजी आमदार अॅड. श्रीपतराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. गॅस व विजेची दरवाढ मागे न घेतल्यास जनता पेटून उठल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देण्यात आला.
लक्ष्मी मंदिरापासून दुपारी साडेबाराला मोर्चाला सुरुवात झाली. बाजारपेठ, वीरशैव चौक, संकेश्वर रोड, मुख्य मार्गावरून मोर्चा प्रांत कार्यालयावर आला. आमच्या मागण्या मान्य करा..., दरवाढ करणाऱ्या सरकारचा..., गॅसचे दर कमी झालेच पाहिजेत..., आवाज कुणाचा... आदी घोषणांनी मोर्चा मार्गावरील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. प्रांत कार्यालयासमोरही जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या ठिकाणी मोर्चाचे रूपांतर सभेत झाले.
अॅड. शिंदे म्हणाले, ‘‘देशात गोरगरिबांचे प्रश्न वाढले आहेत. मात्र, त्याविरोधात लढणाऱ्यांची ताकद कमी झाली आहे. अन्यायाविरोधात लढणाऱ्या शक्ती वाढल्या पाहिजेत.’’ माजी नगराध्यक्षा स्वाती कोरी म्हणाल्या, ‘‘महागाईत भारताचा जगात बारावा क्रमांक आहे. त्यामुळे गरिबांचे जगणे मुश्किल झाले आहे. डोळे झाकून सरकार चालविले जात आहे. राज्यकर्त्यांना सर्वसामान्यांच्या प्रश्नांशी काहीही देणे-घेणे राहिलेले नाही.’’ जनता दलाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव पाटील, युवा जिल्हाध्यक्ष शरद पाडळकर, तालुकाध्यक्ष बाळेश नाईक, शहराध्यक्ष काशिनाथ देवगोंडा, जे. बी. बारदेस्कर, शिवानंद गस्ती यांचीही भाषणे झाली.
दरम्यान, आंदोलकांच्या शिष्टमंडळाने प्रांताधिकाऱ्यांची भेट घेतली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे असलेले निवेदन त्यांना देण्यात आले. निवेदनातून विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. माजी उपनगराध्यक्ष महेश उर्फ बंटी कोरी, नितीन देसाई, शकुंतला हातरोटे, शशिकला पाटील, सुनीता पाटील, नाज खलिफा, हिंदूराव नौकुडकर, रमेश मगदूम, उदय कदम, दत्ता मगदूम, कृष्णा परीट, सागर पाटील, विनोद बिलावर, भीमराव पाटील, मोहन भैसकर, अजित शिंदे, विश्वास खोत, रमेश पाटील यांच्यासह कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते.
------------
चौकट...
...तर मी सोडणार नाही
अॅड. श्रीपतराव शिंदे म्हणाले, ‘‘वाढीव हद्दीतील विकास आराखड्यात कचरा डेपो हिरण्यकेशी नदीकाठी केला आहे. त्याचे दुष्परिणाम होणार आहेत. त्यामुळे तो होऊ नये, यासाठी प्रयत्न करायला हवेत. मी आहे तोवर कचरा डेपो होणार नाही आणि झालाच तर मी सोडणार नाही.’’