
जनता बॅंक आजराच्या अध्यक्षपदी मुकुंदराव देसाई
87730
मुकुंदराव देसाई, महादेव टोपले
जनता बॅंक आजराच्या
अध्यक्षपदी मुकुंदराव देसाई
बिनविरोध निवड; उपाध्यक्षपदी महादेव टोपले
आजरा, ता. ८ : येथील जनता बॅंक लि, आजराच्या अध्यक्षपदी मुकुंदराव बळीराम देसाई यांची, तर उपाध्यक्षपदी महादेव केशव टोपले यांची बिनविरोध निवड झाली. निवडणुक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक गडहिंग्लज अमित गराडे निवड सभेच्या अध्यक्षस्थानी होते.
अध्यक्षपदासाठी देसाई यांचे नाव जयवंतराव शिंपी यांनी सुचविले. शिवाजी पाटील यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्ष टोपले यांचे नाव रणजित देसाई यांनी सुचविले. संतोष पाटील यांनी अनुमोदन दिले. गराडे यांच्या हस्ते नुतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार झाला.
अध्यक्ष देसाई म्हणाले, ‘‘बॅंक स्थापनेनंतर इतिहासात पहिल्यांदा बॅंकेची निवडणुक बिनविरोध झाली आहे. याचे सर्व श्रेय सभासद, हितचिंतक व समाजातील विविध घटकांना जाते. बॅंक अडचणीत असताना बॅंकेची जबाबदारी दहा वर्षांपुर्वी माझ्या खांद्यावर आली. गत दहा वर्षात सहकारी व कर्मचाऱ्यांच्या मदतीने बॅंकेची गाडी रुळावर आणली आहे. बॅंकेचा व्यवसाय पाचपटीने वाढला आहे. आज बॅंकेचे भागभांडवल १३ कोटी, ३१० कोटींच्या ठेवी, २१० कोटीची कर्ज वाटप केले आहे. बॅंकेला सहा कोटी ५० लाखांचा ढोबळ नफा झाला आहे. समाजातील उद्योजक व व्यावसायिकांना बळ देण्यासाठी कर्जप्रक्रिया सुलभ ठेवू.’’ या वेळी रणजित देसाई, बाबाजी नाईक, शिवाजी पाटील, जयवंत कोडक, शशिकांत नार्वेकर, विक्रमसिंह देसाई, अमित सामंत, पांडुरंग तोरगले, महेश कांबळे, संतोष पाटील, रेखा देसाई, नंदा केसरकर उपस्थित होते.