
दोघे चोरटे अटक
87733
--------
रेकॉर्डवरील दोघा चोरट्यांना अटक
तीन लाख आठ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
कोल्हापूर, ता. ८ ः पंचतारांकीत औद्योगिक वसाहतीतील कारखान्यातून चोरीस गेलेल्या मुद्देमालासह चोरी करणाऱ्या दोघा रेकॉर्डवरील चोरट्यांना अटक केली. राज अंजूम मुल्ला (वय २३, रा. मणेर मळा, उजळाईवाडी ता. करवीर) व अकुंश लक्ष्मण पांडागळे ( ५३, रा. राजेंद्र नगर, कोल्हापूर) अशी त्यांची नावे आहेत. संशयित चोरट्यांकडून चोरीस गेलेल्या मालासह एकूण तीन लाख आठ हजार रुपयाचे किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ही कारवाई केली.
दरम्यान, संशयित चोरट्यांकडे अधिक चौकशी केली असता राज मुल्ला, आकाश रघुनाथ चव्हाण (रा. कराड), अकुंश पांडागळे आणि दाद्या उर्फ जुबेर आयुब किल्लेदार (रा. राजेंद्रनगर, कोल्हापूर) यांनी मिळून चोरी केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. जप्त मुद्देमालासह राज आणि अंकुशला पुढील तपासासाठी गोकुळ शिरगांव पोलिस ठाण्याच्या ताब्यात दिले असून अन्य दोघांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. यामध्ये राज मुल्ला याच्यावर जबरी चोरीचे सहा, दरोडा व घरफोडीचे दोन असे एकूण नऊ गुन्हे दाखल आहेत. तसेच संशयित आरोपी आकाश चव्हाण याच्यावर घरफोडीचे दोन गुन्हे दाखल आहेत.
पोलिसांनी सांगितले, की पंचतारांकीत औद्योगिक वसाहत येथील प्लॉट नं. ए १६४ मधील पावडर क्राप्ट या कारखान्यातून बेंडींग डाय, प्रेस डाय व इतर असा मुद्देमाल चोरीस गेला होता. याबाबत गोकुळ शिरगांव पोलिस ठाण्यात नोंद झाली होती. त्याचा तपास करताना चोरलेला माल हा रेकॉर्डवरील संशयित आरोपी राज मुल्ला व त्याचे साथीदार राजेंद्रनगर परिसरात विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक महादेव वाघमोडे यांना मिळाली. त्यानुसार काल उपनिरीक्षक शेषराज मोरे, पोलिस अंमलदार हिंदुराव केसरे, सचिन देसाई, अनिल पास्ते, सोमराज पाटील, दिपक घोरपडे यांनी राजेंद्रनगर येथे सापळा रचून राज मुल्ला आणि अकुंश पांडागळे यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे पावडर क्राफ्ट कारखान्यातून चोरीस गेलेल्या मालापैकी १ लाख २८ हजार रुपयाच्या बेंडींग डाय, प्रेस डाय व इतर साहित्य, तसेच वाहतूक करण्यासाठी वापरलेली मालवाहतूक रिक्षा, मोटारसायकल अशा सुमारे तीन लाख आठ हजार रुपयांच्या मुद्देमालासह ताब्यात घेतले.