
राजाराम-विरोधी गट
87774
...
`राजाराम’ पाच वर्षांसाठी आमच्याकडे द्या
आमदार सतेज पाटील ः चोकाक येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात आवाहन
कोल्हापूर, ता. ८ ः ‘गेली पंचवीस वर्षे महाडीकांच्या ताब्यात असलेला राजाराम कारखाना पाच वर्षे माझ्या ताब्यात द्या, शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेऊ’, असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केले. चोकाक (ता. हातकणंगले) येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.
‘राजाराम’ च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्री. पाटील यांनी हातकणंगले तालुक्यातील हालोंडी, माले, मुडशिंगी ,चोकाक या गावांमध्ये शेतकरी ऊस उत्पादक सभासदांशी संवाद साधला.
ते म्हणाले, ‘छत्रपती राजाराम साखर कारखान्यात माझा लढा शेतकऱ्यांच्यासाठी आहे. गेली २५ वर्षे जिल्ह्यातील राजकारण मी करतोय. साखर कारखाना कार्यक्षेत्रातील १२२ गावांत सर्व सभासदांशी माझी ओळख निर्माण झाली आहे. कारखान्याच्या मागील दोन्ही निवडणुका लढवल्या आहेत. यावेळी परिवर्तन अटळ आहे.’
माजी अध्यक्ष सर्जेराव माने म्हणाले, ‘साखर कारखान्यात श्री. महाडीक हे हुकूमशाही पद्धतीने काम करत आहेत. व्यापारी म्हणून कोल्हापुरात आले आणि कारखाना ताब्यात घेतला. जे सभासद पात्र आहेत ते सांगलीच्या येलूर, तांदुळवाडी ह्या कार्यक्षेत्रातील आहेत.’
मुडशिंगीचे जीवनराव शिंदे म्हणाले, ‘हातकणंगलेमधील आमचे सर्वात जास्त सभासद असलेले गाव आहे. या गावात पाणंद, किंवा शेतकऱ्यांच्या हिताचे कुठलेही काम झालेले नाही सभासदांना गेले २०वर्षे विचारले नाही. मात्र आता निवडणूक जवळ आल्यापासून दररोज भेटीसाठी लोक गावात येत आहेत. मात्र आम्ही यावेळी परिवर्तन केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही.’
यावेळी माजी सरपंच शशिकांत खवरे, पंचायत समिती सदस्य उत्तम सावंत, निलेश पाटील, महेश चव्हाण, सरपंच प्रताप पाटील, डी. आर. माने, प्रशांत शिंदे, सुनिकेत पाटील आदी उपस्थित होते.