
पोलिस वृत्त फाईल २
वीज वाहिनीला स्पर्श झाल्याने पेंटर जखमी
गांधीनगर ः रस्त्याकडील वीज वाहिनीला स्पर्श झाल्यामुळे शॉक लागून पेंटर खाली पडून गंभीर जखमी झाला. सागर उत्तम देसाई (वय ३६, रा. फिरंगाई गल्ली, शिवाजी पेठ, कोल्हापूर) असे जखमीचे नाव आहे. गांधीनगर (ता. करवीर) येथे निरंकारी कॉलनीच्या कमानीचे रंगकाम करताना बुधवारी (ता.८) दुपारी ही घटना घडली. जखमीवर सीपीआरमध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. पोलिसांनी सांगितले, की निरंकारी कॉलनीची कमान रंगविण्याचे काम सुरू आहे. त्या कमानीला लागूनच वीज वितरण कंपनीची सर्व्हीस वाहिनी आहे. रंगकाम करताना देसाई यांचा वीज वाहिनीला स्पर्श झाल्याने विजेचा धक्का बसला. त्यामध्ये खाली पडून ते जखमी झाले. याची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली.
..........
तिसऱ्या मजल्यावरून पडून कामगार जखमी
कोल्हापूर ः साळोखे पार्कजवळ बांधकाम सुरू असलेल्या अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून कामगार गंभीर जखमी झाला. भोलाराम (वय ३०, मूळ रा. उत्तरप्रदेश) असे त्याचे नाव आहे. त्याच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत. याची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली असून याबाबत नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत राजारामपुरी पोलिस ठाण्यात सुरू होते.
------
विषारी द्रव्य प्यायलेल्या एकाचा मृत्यू
कोल्हापूर - औरनाळ (ता.गडहिंग्लज) येथे विषारी द्रव्य प्यायलेल्या एकाचा उपचार सुरू असताना बुधवारी मृत्यू झाला. उत्तम तुकाराम बाडकर (वय ४८) असे त्यांचे नाव आहे. त्यांच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरू होते. बाडकर यांनी तीन दिवसांपूर्वी सकाळी राहत्या घरी विषारी द्रव्य पिले होते. स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात उपचारानंतर त्यांना सीपीआरमध्ये दाखल केले होते. याची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली.
-----------
जखमी कामगाराचा मृत्यू
कोल्हापूर - बिंदू चौक परिसरात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून पडून जखमी झालेल्या कामगाराचा बुधवारी उपचार सुरू असताना मृत्यू झाला. दाऊद हुसेन कमलीवाले (वय ५४, रा. जवाहरनगर, कोल्हापूर) असे मृताचे नाव आहे. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, विवाहित मुलगी असा परिवार आहे. चार दिवसांपूर्वी सकाळी साडेआठच्या सुमारास ते पहिल्या मजल्यावरून तोल जाऊन पडले होते. त्यानंतर त्यांच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरू होते.