
गर्भपाताच्या गोळ्यांची खुलेआम विक्री
गोळ्या घेऊन महिलेने स्वतःच केला गर्भपाताचा प्रयत्न
महिला परप्रांतीय; प्रकृती अस्वस्थेमुळे ‘सीपीआर’मध्ये दाखल
कोल्हापूर, ता. ९ ः गर्भपातच्या गोळ्या घेऊन परप्रांतीय महिलेने स्वतःचा गर्भपाताचा प्रयत्न केला. प्रकृती अस्वस्थ झाल्यामुळे तीने ‘सीपीआर’मध्ये धाव घेऊन उपचार घेतले. या वेळी डॉक्टरांच्या ही बाब निदर्शनास आली. त्यामुळे औषध विक्री दुकानात (मेडिकल दुकान) विनापरवाना गर्भपाताच्या गोळ्यांची विक्री होत असल्याचे स्पष्ट झाले. हे रॅकेट शोधण्याचे आव्हान अन्न व औषध प्रशासनासह पोलिसांसमोर आहे.
काही महिन्यापूर्वीच पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या पुढाकारातून राधानगरी, भुदरगड तालुक्यात बेकायदेशीर गर्भपाताचे रॅकेट उघडकीस आणले. यातून सोनोग्राफी करणारे, बनावट डॉक्टरांचा पर्दाफाश झाला. मात्र, गर्भपाताच्या गोळ्यांची विक्री अद्याप थांबलेली नाही. गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात याबाबतचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया गुरुवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
महिलेकडे पोलिसांनी अधिक माहिती घेतली तेव्हा गर्भपाताच्या गोळ्या खाल्याने झालेल्या त्रासाने ती ‘सीपीआर’मध्ये दाखल झाल्याचे स्पष्ट झाले. याची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली.
गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत परप्रांतीय कुटुंब राहते. त्या कुटुंबाला दोन मुले आहेत. त्यांना तिसरे मूल नको होते म्हणून त्या महिलेने तिसऱ्या महिन्यात गर्भपात करण्याचा निर्णय घेतला. एका सोनोग्राफी सेंटरमध्ये जाऊन तिने विचारणा केली. मात्र, तेथे नकार मिळाल्यामुळे त्या महिलेने औषध विक्री दुकानात जाऊन पंधरा दिवसांपूर्वी गर्भपाताच्या गोळ्या घेतल्या. त्यानंतर तिला त्रास होऊ लागल्यामुळे ती ‘सीपीआर’मध्ये दाखल झाली. पोलिस संबंधित औषध विक्री दुकानदाराचा शोध घेत आहेत. महिलेचा पती गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीत एका फाउंड्रीमध्ये काम करतो, अशी प्राथमिक माहिती पुढे आली आहे.
चौकट
...तर रॅकेट उघडकीस होण्याची शक्यता
सोळाशे रुपयांना पाच गोळ्यांचे पाकीट औषध विक्री दुकानातून घेतल्याची माहिती महिला आणि तिच्या पतीने पोलिसांना दिली. मात्र, कोणत्या औषध दुकानातून खरेदी केली त्याचे नाव सांगता आले नाही. तो प्रत्यक्षात पोलिसांना घेऊन जाऊन दाखवू शकतो असेही सांगत होता, असेही पोलिसांनी सांगितले. प्रामाणिक तपास झाल्यास यातून अनधिकृत विक्री होणाऱ्या गर्भपात गोळ्यांच्या विक्रीचे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे.