
सावित्रीबाईंच्या स्मृतींना विधायक कामांतून उजाळा
सावित्रीबाईंच्या स्मृतींना
विधायक कामांतून उजाळा
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ९ ः विविध विधायक उपक्रमांतून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृती जपण्यासाठी येथील तरुणाईने पुढाकार घेतला आहे. महापालिकेच्या सावित्रीबाई फुले हॉस्पिटलसाठी आवश्यक विविध साहित्य ही मंडळी उपलब्ध करून देत आहेत. सावित्रीबाईंच्या यंदाच्या स्मृतिदिनानिमित्तही अशाच उपक्रमांवर भर दिला जाणार आहे.
विमलाताई बागल नगरपालिकेच्या आरोग्य सभापती असताना त्यांनी शहरात मोफत सुतिकागृहासाठी पुढाकार घेतला आणि १९५१ ला या सुतिकागृहाचा प्रारंभ झाला. सावित्रीबाई फुलेंच्या स्मृती जपण्यासाठी त्याला त्यांचे नाव दिले गेले. सामान्य कुटुंबातील महिलांच्या प्रसूतीसाठी हे हॉस्पिटल आधारवड असून अलीकडच्या काळात विविध सेवाभावी संस्थांनी येथील सोयी-सुविधांसाठी पुढाकार घेतला आहे. काही दिवसांपूर्वी ऑपरेशन थिएटरसाठी लागणारे संक्शन मशीन हॉस्पिटलला दिले तर लवकरच स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जाणार आहे. समाजातील विविध संस्थांच्या माध्यमातून ही कामे सुरू असल्याचे अवधूत अपराध यांनी सांगितले.