
कलानगरी चित्रपट महोत्सव सोमवारपासून
कलानगरी चित्रपट
महोत्सव उद्यापासून
तीन दिवस चित्रपट, लघुपटांची मेजवाणी
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ११ ः येथील भगवान क्रिएशन्सतर्फे सोमवार (ता. १३) पासून कलानगरी कोल्हापूर मराठी चित्रपट महोत्सव रंगणार आहे. यानिमित्ताने सलग तीन दिवस राजर्षी शाहू स्मारक भवनात चित्रपट आणि लघुपटांची पर्वणी कोल्हापूरकरांना मिळणार असल्याची माहिती महादेव साळोखे, अंशुमाला पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
साळोखे म्हणाले, ‘‘कलाकारांनी कलाकारांसाठी असा हा पहिलाच महोत्सव असून सोमवार (ता.१३) आणि मंगळवार (ता.१४) सकाळी नऊ ते रात्री नऊपर्यंत चित्रपट व लघुपटांचे प्रदर्शन होईल. आमदार विनय कोरे यांच्या हस्ते महोत्सवाचे उदघाटन होईल. महोत्सवाच्या वतीने गीतकार जगदीश खेबूडकर पुरस्कार बाबासाहेब सौदागर यांना तर उद्योजक रियाज नदाफ यांना विशेष वास्तूरत्न पुरस्काराने गौरवले जाणार आहे. त्याशिवाय कोरोना काळात कलाकार, तंत्रज्ञांना ज्यांनी मदत दिली त्यांचेही सत्कार होणार आहेत.''‘
महोत्सवासाठी पश्चिम बंगाल, ओरिसा, राजस्थान, कर्नाटक, तामिळनाडूसह महाराष्ट्रातूनही लघुपट आले आहेत. त्याशिवाय सर्वोत्कृष्ट लघुपट, चित्रपटांसह विविध गटातील नामांकनेही जाहीर झाली आहेत. बुधवारी (ता.१५) सायंकाळी साडेसहाला पुरस्कार वितरण होणार आहे. त्यासाठी अभिनेते दिलीप प्रभावळकर, प्रसाद ओक, स्मिता गोंदकर, सुरेखा कुडची, निखिल रत्नपारखी, स्वानंदी बेर्डे आदींची उपस्थिती असेल, असेही त्यांनी सांगितले.